आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॅगन नरमला:सीमावादावर चीन म्हणे- भारतीय सीमेवर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात, चर्चेतून मार्ग काढू; अमेरिकेने दर्शवली मध्यस्थिची तयारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही देशांचे नेते आपसात झालेल्या करारांचे सक्तीने पालन करतील -चीन

भारत आणि चीन एलएसीवर वाद सुरू असतानाच चीनने अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. चीनकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, भारतीय सीमेवर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दोन्ही देश आपसात चर्चा करून यातून मार्ग काढतील. गेल्या काही दिवसांपासून एलएसीवर चीनचे हजारो सैनिक तंबू ठोकून भारतीय सैनिकांना चिथावणी देत आहेत. त्यातच आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी एका पत्रकार परिषदेत आपल्या सरकारची भूमिका बुधवारी मांडली आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या दोन अनौपचारिक भेटींचा दाखला यावेळी चीनचे परराष्ट्र मंत्रालय देताना दिसून आले. यावेळी झालेल्या चर्चांमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांनी महत्वाच्या अशा संमती आणि करारांचे सक्तीने पालन करणार असल्याचे आश्वासन दिले होते अशी आठवण झाओ यांनी यावेळी बोलताना करून दिली आहे.

याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन वादात उडी घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांत सुरू असलेल्या वादामध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारताने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता. तसेच काश्मीर हा मुद्दा आपला अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते.

आपसात फूट पाडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला हवे

भारतात चीनचे राजदूत सुन वीडोंग यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत आणि चीन एकत्रित येऊन कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. संबंध चांगले ठेवणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे. ही गोष्ट दोन्ही देशांतील युवकांना देखील समजायला हवी. आपसात फूट पाडतील अशा गोष्टींपासून आपल्याला दूर राहण्याची गरज आहे. परस्पर चर्चा करण्यासाठी आपसातील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.

काय आहे वाद?

लडाखच्या गालवन परिसरात नुकताच चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये तणाव झाला होता. लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) जवळ चीनने आपले 5 हजारांपेक्षा जवान तैनात करून तात्पुरते तंबू ठोकले होते. चीनने गेल्या काही दिवसांपासून भारतीय हद्दीत घुसखोरी वाढवली आहे. हे पाहता भारतीय लष्कराने सुद्धा आपले अतिरिक्त जवान या परिसरांमध्ये तैनात केले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक तीन वेळा समोरासमोर आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. गेल्या आठवड्यातच दोन्ही देशांच्या कमांडर स्तरीय अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

बातम्या आणखी आहेत...