आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायली गुप्तहेरांचे जाळे कसे आहे याचे बिंग फुटू लागले आहे. १० देशांच्या माध्यमांतील शेकडो पत्रकारांनी याचा पर्दाफाश केला आहे. इस्रायली कंपनी एनएसओचे स्पायवेअर “पेगासस’च्या माध्यमातून जगभरातील सरकारे पत्रकार, नेते, जज, वकील, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करत आहेत. फ्रान्सची संस्था फॉडबिडन स्टोरीज आणि ॲमनेस्टी इंटरनॅशनलने मिळून ही माहिती एकत्रित केली आहे. भारतातही याचा वापर केला, पण कुणी केला हे नंतर जाहीर होईल. ॲमनेस्टी इंटरनॅशनलने पहिल्या मालिकेत म्हटले आहे की, भारतात या हेरगिरीचे शिकार ठरलेल्यांची संख्या ४० हून अधिक आहे.
वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत ४० भारतीय पत्रकार, ३ प्रमुख विरोधी नेते, २ मंत्री आणि एका न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे, पण त्यांची नावे सांगण्यात आली नाहीत. पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क-१८, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.
पहिल्या यादीत जगभरातील १८० पत्रकारांची नावे
पेगासस प्रोजेक्टशी निगडित माध्यम संस्थांनी रविवारपासून खुलासे सुरू केले. सर्वप्रथम सांगितले की या यादीत जगभरातील १८० हून अधिक पत्रकार आहेत. त्यात फायनान्शियल टाइम्स, सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्स, फ्रान्स २४, द इकॉनॉमिस्ट, एपी व रॉयटर्सचे रिपोर्टर, संपादकांचा समावेश आहे. या पत्रकारांच्या यादीत मेक्सिकोतील एका फ्रीलान्स रिपोर्टर सेसिलियो पिनेडा बिर्टो यांचाही समावेश असून त्यांची हत्या झाली आहे.
अनेक देशांत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची हेरगिरी, लवकरच नावे जाहीर करू
द गार्डियनने सांगितले की, लवकरच ज्या लोकांचे मोबाइल हेरगिरीच्या यादीत आहेत त्यांची नावे जाहीर केली जातील. यात अनेक देशांचे उद्योगपती, धार्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, एनजीओ कर्मचारी, मजूर संघटना आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही देशांचे राष्ट्रपती व पंतप्रधानही या यादीत आहेत. यात एका देशाच्या शासकाचा नातेवाइकही आहे. याच शासकाने इंटेलिजन्स एजन्सीजना आपल्या नातेवाइकाची हेरगिरी करण्यास सांगितले असावे, असा संशय आहे.
एनएसओचे स्पष्टीकरण...
पेगासस सॉफ्टवेअर इस्रायलची कंपनी एनएसओच विकते. त्याचा हेरगिरीसाठी वापर केला जातो. यावर कंपनीने म्हटले आहे की, ही यादी आमच्या सॉफ्टवेअर फंक्शनिंगशी जोडलेली नाही. कंपनीने असेही सांगितले आहे की,‘लीक झालेल्या डेटात ते फोन नंबर नाहीत, जे जगातील वेगवेगळ्या सरकारांनी पेगासीसमार्फत टार्गेट केले होते.’
२०१९च्या निवडणुकीपूर्वी शोधपत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींची हेरगिरी सुरू झाली
‘फॉरबिडन स्टोरीज’ आणि ‘ॲमनेस्टी इंटरनॅशनल’ नुसार, भारतात ज्या लोकांची हेरगिरी झाली त्यात काही ज्येष्ठ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे. २०१९च्या निवडणुकीपूर्वी ही हेरगिरी सुरू करण्यात आली. यात बहुतांश पत्रकार शोधपत्रकारिता करणारे होते. वॉशिंग्टन पोस्टनुसार, या पत्रकारांची नावे लवकरच जाहीर होतील. या पत्रकारांच्या मोबाइलमध्ये स्पायवेअरचे ट्रेस सापडले आहेत. या माध्यमातूनच त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती लीक होत राहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.