आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे अमेरिकेतील एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. महामारीमुळे त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांसमोर दोन पर्याय उरले आहेत. एक म्हणजे नव्या रोजगाराचा शोध घेऊन व्हिसाची मुदत वाढवणे आणि दुसरे म्हणजे अमेरिकेला सोडून निघून जाणे. अशा श्रेणीतील व्हिसासाठी ६० दिवसांची वाढीव मुदत मिळते. परंतु या काळात दुसरी नोकरी शोधणे अनिवार्य आहे. वास्तविक कोरोनामुळे डबघाईला येणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे लोकांना दुसरी नोकरी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. म्हणूनच अमेरिका सोडून जाण्यावाचून अनेकांसमोर काही पर्याय राहिलेला नाही. नोकरी गमावल्यानंतर भारतीय व्यावसायिकांवर तर आपला बिछाना, सोफा व इतर सामान विक्री करण्याची वेळ आली आहे. गेल्या एक वर्षात परदेशी व्यावसायिक बेरोजगार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एका भारतीय अभियंत्याच्या म्हणण्यानुसार केवळ व्हिसा स्टेटस बघून नियोक्त्याकडून नकार देण्यात आला. जगभरातील व्यावसायिक कामाच्या शोधात एच-१ बी व्हिसाच्या साहाय्याने अमेरिका गाठतात. त्यात भारतीयांची संख्या सर्वाधिक असते. अमेरिकेच्या स्थलांतरित विभागातील अधिकारी जेनिफर मायनर म्हणाल्या, सद्य:स्थितीत नोकरी गमावून अनिश्चितता वाढली. स्थलांतरितांसाठी त्याची तीव्रता जास्त असते.
भारतात यूएस कॉन्सुलेट बंद, अनेक लोक अडकले
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन अमेरिकेने भारतावर ट्रॅव्हल बॅन लागू केला. त्यामुळे अनेक प्रवासी येथे अडकले आहेत. ही बंदी किती काळ राहणार आहे याबाबत अनिश्चितता आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत कार्यालय बंद आहे. त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांची माहिती मिळू शकलेली नाही. अमेरिकेत स्किल्ड इमिग्रेंट्सच्या सहसंस्थापक नेहा महाजन म्हणाल्या, पती वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी भारतात गेले होते. मी अमेरिकेत दोन मुलींसह आहे. राजदूत कार्यालय बंद असल्याने पती कधी परततील याबद्दल काही सांगता येत नाही. नॅशविलेमध्ये अडकलेल्या पायल राज म्हणाल्या, नऊ वर्षांच्या मुलासह भारतात कधी परत येईल याची मला कल्पना नाही. बंदीमध्ये अशा कुटुंबांना लक्ष्य करण्यात आले आहे. इतर देशांवरील बंदीचा इतिहास पाहिल्यास ती अनेक महिने किंवा वर्षभरही राहू शकते.
आता ब्रिटनमध्ये विना अडथळा भारतीयांना काम करण्याची संधी
भारत व ब्रिटनने स्थलांतरितांबाबतच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. त्याअंतर्गत भारतीयांसाठी वर्क व्हिसामध्ये वाढ केली आहे. नव्या करारानुसार भारतीय व ब्रिटिश तरुण दोन वर्षांपर्यंत परस्परांच्या देशात राहू शकतात. त्याचबरोबर कामही करू शकतात. नव्या करारामुळे बेकायदा राहणाऱ्या लोकांना मूळ देशात पाठवण्याची प्रक्रिया वेगाने करता येणार आहे. आता भारतातील दडून बसलेल्या गुन्हेगारांना ब्रिटनच्या नियमांनुसार भारतात आणण्याची प्रक्रिया गतिमान होऊ शकेल. पंतप्रधान बोरिस जॉन्सन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील ऑनलाइन बैठकीनंतर ही उपाययोजना झाल्याचे मानले जाते.
भारतात अडकलेल्या लोकांच्या एच-१ बी व्हिसावर मोहोर नाही
भारतात अमेरिकेचे राजदूत कार्यालय बंद असल्याने अनेकांच्या नोकरीवर संक्रांत आहे. उत्कर्ष हजार्निस २०१३ पासून अमेरिकेत राहतात. परंतु आता ते भारतात अडकले आहेत. कार्यालय बंद असल्याने त्यांच्या व्हिसावर मोहोर लावता आलेली नाही. त्यामुळे नोकरीवर संकट आहे. मुंबईत अभिनव अमरेश अडकले आहेत. कारण, मंुबईत अमेरिकेचा वाणिज्य दूतावास बंद आहे. त्यामुळे त्यांनाही व्हिसावर मोहोर लावून घेता आली नाही. व्हिसावर मोहोर लागत नाही तोवर अमेरिकेला परत जाता येत नाही. मोहोर लावता येत नसल्यामुळे अनेकांना मायदेशात राहावे लागत आहे. त्यामुळे असंख्य लोकांवर संकट आेढावले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.