आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Interested In Mathematics, Learned Coding, Set Up A Company During Summer Vacation, Worth Rs 56,000 Crore In 6 Years

पंचविशीतच अब्जाधीश:गणितात रस असल्याने कोडिंग शिकले, उन्हाळी सुटीत कंपनी स्थापन केली, 6 वर्षांत मूल्य 56 हजार कोटी रुपये

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ब्ज नियतकालिकाने अलीकडेच अमेरिकेच्या अलेक्झांडर वांग यांना जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश घोषित केले आहे. आशियाई वंशाच्या २५ वर्षीय अलेक्झांडर यांची अब्जाधीश होण्याची कहाणी त्यांच्या वयाएवढीच छोटीशी आहे. गणितात रस असल्याने इयत्ता सहावीपासून राष्ट्रीय गणित आणि कोडिंग स्पर्धेत सहभागी होत होते. त्यामागे डिस्ने वर्ल्डचे तिकीट मोफत मिळवण्याचा हेतू होता. स्पर्धेत विजय तर मिळाला नाही, पण त्यामुळे त्यांच्यात कोडिंगबाबत उत्सुकता निर्माण झाली. वयाच्या १७ व्या वर्षी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी क्वोरा या वेबसाइटसाठी पूर्णवेळ कोडिंग सुरू केले. मशीन लर्निंग शिकण्यासाठी एमआयटीत (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजी) प्रवेश घेतला, पण एक वर्ष शिकल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीतच लुसी ग्युओंसोबत ‘स्कॅल एआय’ कंपनी सुरू केली.

शिक्षण मध्येच सोडून कंपनी सुरू करण्याचा निर्णय वांग यांच्या आई-वडिलांना मान्य नव्हता. वांग सांगतात,‘ कॉलेज सुरू होताच मी हे काम सोडून देईन,’ असे मी त्यांना समजावले. पण तसे झाले नाही. वांग यांच्या कंपनीला फंडिंग मिळाले आणि सुरुवातीलाच यश मिळाल्याने आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहित केले. त्यांचे आई-वडील अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत लष्करासाठी शस्त्रास्त्रे तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करत होते. याच प्रयोगशाळेत अमेरिकेने दुसऱ्या जागतिक महायुद्धासाठी पहिला अणुबॉम्ब बनवला होता. वांगही आता एआयमुळे लष्करास मदत करत आहेत. त्यांची कंपनी मानवी क्षमतेच्या तुलनेत जास्त वेगाने उपग्रहाने पाठवलेल्या इमेजचे विश्लेषण करते. अलीकडेच त्यांच्या कंपनीने विश्लेषण करून रशियाच्या हल्ल्यांत किती नुकसान झाले याची माहिती युक्रेनला दिली.

‘फॉर्च्युन’नुसार, वांग यांची कंपनी अमेरिकेचे वायुदल, लष्कर, जनरल मोटर्ससह ३०० वर कंपन्यांना त्यांच्या डेटाचे विश्लेषण करून देते. वांग म्हणतात,‘जगभरात विखुरलेली माहिती जहाजांत भरलेल्या दस्तऐवजांप्रमाणे आहे. आम्ही हा डेटा गोळा करून कंपन्यांसाठी त्यांचे विश्लेषण करतो.’

६ वर्षांपूर्वी सुरू केली कंपनी, एआयद्वारे लष्कराला करतात मदत
वांग यांनी ६ वर्षांपूर्वी कंपनी सुरू केली होती. तेव्हापासून ८४७ कोटी रुपयांचे तीन करार त्यांनी केले आहेत. ते वेळोवेळी अमेरिकेचे वायुदल आणि लष्कराला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मदत करतात. गेल्या वर्षी २५०० कोटी रुपयांचे फंडिंग मिळाल्यानंतर कंपनीने ७७० कोटी रु. चा महसूल मिळवला. कंपनीचे मूल्य वाढून ५६,२१० कोटी रुपये झाले आहे. वांग यांचा हिस्सा १५% आहे, त्याचे मूल्य जवळपास ७,७०० कोटी रुपयांएवढे आहे.

बातम्या आणखी आहेत...