आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराणमध्ये सुरू असलेले आंदोलन रोखण्यासाठी तेथील सरकार आता अल्पवयींनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याच्या विचारात आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, इराणने सराकरविरोधात आंदोलन करणाऱ्या 3 अल्पवयीनांना आरोपी घोषित करण्यात आले आहे. या तिघांसह इतर आरोपींवर तेहरानमधील एका पोलिस अधिकाऱ्याला ठार मारण्याचा व भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर खटलाही चालवण्यात येत आहे. इराणमध्ये अशा प्रकरणांत मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.
हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणे हाताळणाऱ्या कोर्टात चालवले जात आहे. तिन्ही अल्पवयींनांविरोदात बुधवार व गुरुवारी तेहरानच्या कराजमध्ये सुनावणी झाली. त्यात न्यायाधीशांनी या तिघांवरही इतर प्रौढ आरोपींसारखा खटला चालवण्यास परवानगी दिली. इराणच्या कायद्यानुसार, रिव्होल्यूशनरी कोर्टाला अल्पवयीन आरोपींवर खटला चालवण्याची परवानगी नाही. वृत्तसंस्था मिजावच्या वृत्तानुसार, सुनावणी करणारे न्यायमूर्ती क्रिमिनल व जुव्हेनाइल प्रकरणे हाताळण्यास सक्षम होते. त्यामुळे या प्रकरणात असे करण्यात आले.
आंदोलकांना मृत्युदंडाद्वारे घाबरवण्याचा प्रयत्न
तिन्ही अल्पवयीनांवरील ट्रायलला मानवाधिकार संघटनेने विरोध केला आहे. इराणमधील सत्ताधाऱ्यांवर आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सातत्याने बळाचा अमानुष वापर करण्याचा आरोप होतो. द गार्डियनच्या वृत्तानुसार, इराणमधील निदर्शनांत आतापर्यंत 60 हून अधिक बालकांचा बळी गेला आहे. त्यांचे वय 18 वर्षांहून कमी होते. त्यात 12 मुली व 46 मुलांचा समावेश होता. इराणमध्ये कुर्दिस्तानात आंदोलनाची धग सर्वाधिक आहे. एका मानवाधिकार संघटनेच्या मते, आतापर्यंत 200 अल्पवयीनांना अटक करण्यात आली आहे. तर 300 हून अधिक अल्पवयीन सरकारच्या गोळीबारात जखमी झालेत.
अल्पवयींना शिक्षा देण्यात इराण टॉपवर
इराणने अल्पवयीनांना मृत्युदंडाची शिक्षा न देण्याप्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे. पण त्यानंतरही तो या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. मानवाधिकार संघटनेच्या माहितीनुसार, इराणमध्ये 9 वर्षांवरील मुलींना मृत्युदंड देता येऊ शकतो. मुलांसाठी हे वय 15 वर्षांचे आहे. 2005 ते 2015 पर्यंत जवळपास 73 मुलांना इराणमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अल्पवयीन तरुणांना शिक्षेवर अंमलबजावणी होण्यापूर्वी 7 वर्षे कारावास भोगावा लागतो. काही प्रकरणांत ही शिक्षा 10 वर्षांचीही असते. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार 18 वर्षांखालील आरोपींना फाशीची शिक्षा देता येत नाही.
इराणमधील मृत्युदंडाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता
इराणमध्ये आंदोलनाचा जोर वाढल्यानंतर मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील अनेक देश व आंतरराष्ट्रीय संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. गत महिन्यातच संयुक्त राष्ट्र मानवाधिकारांचे उच्चायुक्त व्होल्कर टुर्क यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते - यंदा सप्टेंबरपर्यंत 400 जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. हा आकडा मागील 5 वर्षांतील सर्वात मोठा आहे. 2021 मध्येही 330 जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तत्पूर्वी, 2020 मध्ये हा आकडा 276 एवढा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.