आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन भारत दौऱ्यावर पोहोचलेत. त्यांचा हा 3 दिवसीय दौरा होता. पण इस्रायलकडून मिळालेल्या सुरक्षा इशाऱ्यानंतर कोहेन यांनी आजच मायदेशी परतणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते एका ट्विटद्वारे म्हणाले – इस्रायलमध्ये घडत असलेल्या घटना पाहून मला आजच माझा दौरा संपवावा लागेल. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मी इस्रायलला परत जाणार आहे. तत्पूर्वी, त्यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या भारत-इस्रायल बिझनेस फोरममध्येही कोहेन सहभागी झाले. ते म्हणाले- दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारावर मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करेन. कोहेन यांच्यासोबत या दौऱ्यात 25 कंपन्यांच्या शिष्टमंडळाचाही समावेश आहे. पूर्वीनियोजित वेळापत्रकानुसार कोहेन 10 मे रोजी आग्रा येथे जाणार होते. तिथे ते एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.
ज्यू स्मारकांचे करणार होते उद्घाटन
कोहेन 11 मे रोजी ते मुंबईला जाणार होते. तिथे ते ज्यूश ट्रेलचे (ज्यूंचे स्मारक) उद्घाटन करणार होते. भारत सरकार ही स्मारके जगभरातील पर्यटकांसाठी खुली करण्याची तयारी करत आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये इस्रायलचे अर्थमंत्री नीर बरकत 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. ऑटोमोटिव्ह, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या भेटीचा उद्देश होता.
ज्यूंना भारतात सुरक्षित वाटते
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात बरकत म्हणाले होते – इस्रायल व भारताच्या अर्थव्यवस्थेतील सहकार्यासाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. दोन्ही देशांतील नागरिकांत घनिष्ट संबंधही आहेत. इस्रायलच्या नागरिकांना भारतीय आवडतात. येथे आल्यानंतर मला जाणवले की, भारतीय देखील इस्रायली लोकांना खास मानतात. दोन्ही देशांमध्ये 2000 वर्ष जुने नाते आहे. ज्यू जगभर संकटांचा सामना करत असताना त्यांना भारतात सुरक्षित वातावरण मिळाले.
तत्पूर्वी, मार्चमध्ये इस्रायली संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना संसदेच्या शिष्टमंडळासह भारतात आले होते. दुसरीकडे, जानेवारीमध्ये पीएम मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर इस्रायलच्या राजदूताने अशी माहिती दिली होती की, वर्षाच्या अखेरीस नेतन्याहू भारताला भेट देऊ शकतात.
नेतन्याहू पंतप्रधान मोदींचे खास मित्र
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले होते. ते म्हणाले होते - ‘माझे मित्र’ नेतन्याहू यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही एकत्रितपणे भारत-इस्त्रायल धोरणात्मक भागीदारी पुढे नेऊ.
5 वर्षांपूर्वी नेतन्याहू पंतप्रधान असताना भारतात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. त्याचवर्षी ते इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. इस्रायलला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान होते. दोन्ही नेते एकमेकांचा मित्र म्हणून उल्लेख करतात. नेतन्याहू पंतप्रधान झाल्यावर भारताने इस्रायलसोबत दहशतवाद, तंत्रज्ञान व व्यापारावर एकत्र काम करण्याची आशा व्यक्त केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.