काबूल : गुरुद्वाऱ्यावर अतिरेक्यांचा हल्ला; 27 शिखांचा मृत्यू, 8 जण जखमी

  • हल्ल्याच्या वेळी गुरुद्वाऱ्यात 150 पेक्षा जास्त भाविक उपस्थित

वृत्तसंस्था

Mar 26,2020 09:42:00 AM IST

काबूल/नवी दिल्ली - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका गुरुद्वाऱ्यात बुधवारी बंदूकधारी आत्मघाती अतिरेक्यांनी हल्ला केला. यात शीख समुदायातील एका मुलासह २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जण जखमी आहेत. सुरक्षा दलांनी ११ मुलांसह ८० जणांना वाचवले.


धर्मशाला गुरुद्वाऱ्यात चार बंदूकधारी अतिरेक्यांनी सकाळी ७.४५ वाजता हल्ला केला. याचे वृत्त कळताच सुरक्षा दलांनी गुरुद्वाऱ्याला वेढा घातला व तेथील लाेकांना बाहेर काढले. सहा तासांच्या धुमश्चक्रीनंतर सुरक्षा दलांनी चारही आत्मघाती अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यादरम्यान अतिरेकी व सुरक्षा दलांत काही अंतराने गोळीबार होत होता. हल्ल्यानंतर घटनास्थळाला भेट देणारे अफगाणिस्तानचे शीख खासदार नारर्देंडरसिंह खालिसा म्हणाले की, हल्ल्याच्या वेळी गुरुद्वाऱ्यात १५० पेक्षा जास्त भाविक उपस्थित होते. अशरफ गनी सरकारने हल्ल्यासाठी पाकिस्तान समर्थित हक्कानी नेटवर्कला जबाबदार धरले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी या हल्ल्यामागे आमच्या संघटनेचा हात नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

X