आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोरंटो:करीमा यांनी आत्महत्या केल्याचे वाटत नाही : लतीफ

टोरंटो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रात करीमांसह (डावीकडून) लतीफ. - Divya Marathi
छायाचित्रात करीमांसह (डावीकडून) लतीफ.
  • 17 डिसेंबरला बलुचिस्तानच्या मानवी हक्क कार्यकर्तीचा कॅनडामध्ये मृत्यू

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्या करीमा बलुच यांचा गेल्या आठवड्यात कॅनडात मृत्यू झाला. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. कॅनडाच्या पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण मानले आहे. टोरंटोमधील करीमा यांचे निकटवर्तीय मित्र लतीफ जोहर बलुच यांनी दैनिक भास्करसाठी अमित चौधरी यांच्याशी चर्चा केली. लतीफ देखील बलुचच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत. करीमांचे ते कौटुंबिक मित्र आहेत. पाकच्या दडपशाहीला कंटाळून लतीफ यांनीही २०१६ मध्ये करीमा यांच्यासह कॅनडात राजाश्रय घेतला होता. चर्चेचा मुख्य अंश...

कॅनडा पोलिसांनी कारस्थानाकडे इशारा केला नाही? मग ही आत्महत्या असल्याचे तुम्हाला वाटते?
टोरंटो पोलिसांवर आमचा विश्वास आहे. परंतु करीमांनी आत्महत्या केल्याचे आम्ही मानत नाही. त्या अशा प्रकारची महिला नव्हत्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते. परंतु त्यांनी त्यापुढे हार मानली नाही.

त्यांच्या मृत्यूमागे पाकचा हात वाटतो?
हत्येमागे कोण आहे, हे मी सांगू शकत नाही. परंतु इतिहासाकडे पाहिल्यास बलुचिस्तानच्या संघर्षात आवाज उठवणाऱ्या अनेक लोकांची पाकिस्तान किंवा परदेशात हत्या झाल्याकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. यात आमचे अनेक मित्रही सामील आहेत. कॅनडा पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास करावा, असे आमचे त्यांना आवाहन आहे.

करीमांशी कधी भेट झाली होती? बलुचच्या काही प्रकल्पांवर कार्यरत होत्या?
करीमा यांची भेट त्या बेपत्ता होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे १७ डिसेंबरला टोरंटो विद्यापीठाच्या ग्रंथालयात झाली होती. तेव्हा आमच्यासोबत आणखी एक मित्रही होता. तिने जवळच्या एका रेस्तराँमधून आमच्यासाठी खाण्याचे पदार्थ आणले होते. आम्ही अभ्यासाबराेबरच अनेक विषयांवर चर्चा केली. बलुचबाबत अनेक प्रकल्पांवर चर्चा व्हायची. त्या दिवशीही झाली होती.

ते कोणते प्रकल्प होते? त्याबद्दल काय सांगाल?
मी या प्रकल्पाबद्दल माध्यमांना काही माहिती देऊ शकत नाही.

पोलिसांनी काही चर्चा केली?
पोलिसांनी आतापर्यंत कुटुंबाला ठोस पुरावा दिलेला नाही. त्यांना आत्महत्या का वाटते, याबद्दल पोलिसांनी काहीही माहिती दिली नाही.

करीमांच्या मृत्यूनंतर स्वत:ला सुरक्षित समजता का?
माझ्यासह बलुचिस्तान स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...