आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोव्हिएत देश कझाकिस्तानमधील सरकार कोसळले आहे. तेलाचे दर वाढवण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट आल्याचे सांगितले जाते. सरकारने पेट्रोलियम पदार्थ, घरगुती गॅस, गॅसोलिनच्या दरात वाढ केली. त्याच्याविरोधात देशभरात निदर्शने, हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारला राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रपती कसीम-जोमार्ट तोकायेव यांनी बुधवारी हा राजीनामा स्वीकारला. याबरोबरच १९ जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आर्थिक राजधानी अल्माटी व मंगिस्टाऊ प्रांतात रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. सरकारने राजीनामा दिल्यानंतर सरकार समर्थक अल्माटीच्या रस्त्यावर उतरले आहेत.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार व अश्रुधुराचा वापर केला. निदर्शकांच्या हल्ल्यात १०० वर जवान जखमी झाले. हिंसाचार उसळल्याने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने इंटरनेट बंद करूनकाही भागात विशिष्ट मेसेजिंग अॅप्सला बंद केले. देशातील व्यापार वर्गाची संघटना अतामेकनच्या काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार समाजविघातक जमावाने बँक, दुकाने, रेस्तराँ यांना लक्ष्य केले. शिस्तीचे राष्ट्र अशी कझाकिस्तानची प्रतिमा आहे. देशात राजकीय स्थैर्य आहे. म्हणूनच तीन दशकांपासून देशाने सातत्याने परकीय गुंतवणुकीला आकर्षित केले आहे. तेल, धातू उद्योगांत हजारो कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आहे.
आणीबाणीच्या काळात शस्त्रे, दारूगोळा, मद्यविक्री होणार नाही. देशात इंधन दरवाढीच्या विरोधातील निदर्शनांची सुरुवात मांगिस्ताऊपासून झाली होती. हा प्रांत तेलाचे केंद्र आहे. लवकरच हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. निदर्शनांचे फुटेज समोर आले आहेत. त्यात नागरिक लष्कर तसेच पोलिसांच्या वाहनांना पेटवून देताना दिसून येतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.