आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकात्याहून जवळपास १२५ किमी दूर उत्तर २४ प्रांतातील बोयरा गावात मुले भारत-बांगलदेशच्या मध्ये निश्चिंत होऊन खेळतात. जवळच बीजीबीच्या (बॉर्डर गार्ड बांगलादेश) जवानांनी पत्र्याचे शेड मारले आहे. मुलांना विचारले, तुम्ही बांगलादेशच्या भागात खेळत आहात... हे तुम्हाला माहीत आहे? त्यावर मुले केवळ हसली आणि खेळण्यात मश्गुल झाली. जणू त्यांना काहीच फरक पडला नाही. ही मुले अशा कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यांच्या घरचे स्वयंपाकघर भारतीय सीमेत तर बेडरूम आणि इतर भाग बांगलादेशात येतो.
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवर वसलेले बोयरा गाव. ६० घरे सीमेला लागून आहेत. मात्र, मंडल बाडी कुटुंबाची बातच निराळी. दोन्ही देशांच्या सीमारक्षकांसाठी हे कुटुंब पिलर नंबर ३९/११ एस आहे. कुटुंबप्रमुख रिजाउल मंडल सांगतात की, ‘कुटुंबाला दोन्ही देशांत येण्या-जाण्यासाठी कोणतीही कागदपत्रे लागत नाहीत. कुटुंबाकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. सीमा असल्यामुळे बीएसएफ आणि बीजीबीचे जवान गस्त घालतात.’ बांगलादेश फाळणीवेळी २३ वर्षांचे असलेले रिजाउल आता ७६ वर्षीय झाले आहेत. रिजाउल सांगतात की,‘आधी ३० गुंठे जमीन होती. फाळणीनंतर भारतात १६ गुंठेच राहिली. उर्वरित बांगलादेशात गेली. आमचे कुटुंब गेल्या २०० वर्षांपासून येथे राहते. ब्रिटिश राजवटीपासून आतापर्यंत अनेक पिढ्या येथे वाढल्या. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही कुंपणाचा अडसर आला नाही. फाळणीसंबंधी कागदपत्रे आजही माझ्या जवळच आहेत. मात्र मतदान आतापर्यंत भारतातच केले आहे. रिजाउल यांनी सांगितले की, ‘सर्वकाही सुरळीत सुरू होते. आम्ही दोन्ही देशांत राहत आहोत, हे आम्हाला माहीत नव्हते. बांगलादेशला वार्षिक ३०० तर भारताला ७२ रुपये कर देतो. बांगलादेशकडून दरमहा १० मण तांदळाची मंजुरी मिळायची. तेथील धान्य येथे विकता यायचे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून परिस्थिती बदलली. बांगलादेशने नागरिकत्व काढून घेतले. आता फक्त भारताचे नागरिकत्व आहे. बांगलादेशच्या भागातील जमिनीवर कुंपण घालण्यात येणार आहे. आम्ही भारतात राहून आनंदी आहोत.’
रिजाउल यांचे कुटुंब परिसरात अतिशय प्रसिद्ध आहे. लोक लगेच पत्ता सांगतात. रिजाउल यांना दोन्ही देशांच्या मैत्रीचे उदाहरण मानतात. शेजारी संतोष मंडल म्हणाले की, या कुटुंबाला पाहिले की आनंद होतो. या घरातच दोन्ही देश वसलेले आहेत. रिजाउल यांना पाच भाऊ आहेत. त्यातील तीन बांगलादेशात राहून शेती करतात. दोन भाऊ पश्चिम बंगालच्या बनगावात राहतात. रिजाउल मंडल यांचे १६ सदस्यांचे कुटुंब आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.