आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खेळी मावळतीला लागली आहे. पीएमएलएनचे नेते शाहबाज शरीफ यांच्याकडे नूतन पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू व पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले शाहबाज पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. इम्रान सरकार कोसळल्यानंतर शाहबाज पंतप्रधान होणे जवळपास निश्चित मानले जाते. राजकीय खेळीत इम्रान खान यांना ‘शह’ देण्यामध्ये शाहबाज यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यांनी पंजाबच्या राजकारणात इम्रान यांना मात देण्यासाठी त्यांची नाकेबंदी केली.
थोरले बंधू नवाझ शरीफ लंडनमध्ये असल्यामुळे शाहबाज यांनी पक्षाची धुराही चांगल्याप्रकारे सांभाळली होती. शाहबाज यांना चांगले प्रशासक म्हणून ओळखले जाते. नवाझ शरीफ यांच्या विरुद्ध त्यांचे लष्कराशी देखील चांगले संबंध आहेत. पाकिस्तानातील सद्य:स्थितीत लष्कराने इम्रान यांना समर्थन देणे बंद केले. ते पाहता लष्कराचा शाहबाज यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. सोबतच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरचे काम शाहबाज यांनी मुख्यमंत्री पदावर असताना वेगाने पूर्ण केले होते. शाहबाज शरीफ यांना चीन ‘पंजाब स्पीड’ असे संबोधतो.
भारत : युद्धबंदीची बाजवा यांची इच्छा शाहबाज पंतप्रधान झाल्यास पाकिस्तान काश्मीरच्या मुद्द्यावर युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी आधीच युद्धबंदीचा मुद्दा मांडला आहे. भारताने तयारी दर्शवल्यास पाकचा आक्षेप नाही. पुढे दोन्ही देशांत व्यापारही सुरू होऊ शकताे, अशी लष्कराचीही रणनीती दिसून येते.
अमेरिका : संबंध प्रस्थापित करणार इम्रान खान यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधांना महत्त्व न देता रशिया-चीनशी भागीदारीचे धोरण स्वीकारले होते. शाहबाज पंतप्रधान झाल्यास त्यांचा कल अमेरिकेकडे राहील. अमेरिकेची सध्या पाकिस्तानबद्दल कटू अशी भूमिका आहे. नवाज यांच्या कार्यकाळात परराष्ट्र धोरणात अमेरिकेला महत्त्व होते.
अफगाणिस्तान : तालिबानशी तडजोड इम्रान खान यांचे तालिबानसोबतचे धोरण मिळमिळीत होते. अफगाण सीमेवरील तारेच्या कुंपणावरून वाद आहेत. पाक सैनिकांना तालिबानी लढवय्यांच्या गोळीबाराला तोंड द्यावे लागते. गेल्या तीन वर्षांत पाकच्या ५५० हून जास्त सैनिकांचा मृत्यू झाला. शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यास तालिबानसोबत तडजोडीचा प्रयत्न करतील.
परतणी : नवाज मायदेशी येणे शक्य लंडनमध्ये उपचारासाठी राहणाऱ्या नवाज शरीफ यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न शाहबाज करू शकतात. पनामा पेपर्स प्रकरणात नाव आल्यापासून लंडनला आहेत. हा राजकीय कट असल्याचा दावा शरीफ कुटुंबाने केला. शाहबाज यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत.
आव्हान: महागाईला लगाम आवश्यक
पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे इम्रान सरकारच्या विरोधात सामान्य जनतेत रोष आहे. महागाई १४ टक्क्यांनी वाढली आहे. शाहबाज यांच्यासमोर महागाईचे मोठे आव्हान असेल. पाकला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घ्यावे लागेल. जीवनावश्यक वस्तूंचे दर सामान्यांच्या हाताबाहेर आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.