आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील मोहमंद या आदिवासी जिल्ह्यातील बाजारपेठा, रस्ते आणि बाजार मंगळवारी बंद राहिले. या जिल्ह्यात दीर्घकाळापर्यंत वीज भारनियमन केले जात असल्याने लोक या विरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या वीज वापरामुळे पाकिस्तानातील वीज निर्मिती केंद्रांवर भार आल्याने तो कमी करण्यासाठी वीज भारनियमनाचा येथे पर्याय निवडला गेला. डॉनच्या वृत्तानुसार संतप्त निदर्शकांनी घलनई ग्रिड स्टेशनसमोरील मुख्य पेशावर-बाजौर रस्त्यावर ठिय्या मांडला होता. आंदोलकांनी तक्रार केली की, गेल्या काही महिन्यांपासून वीज भारनियमनाचा कालावधी २३ तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील आदिवासी भागातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे वीज कृती समितीने हे आंदोलन छेडले आहे. या समितीत मलिक निसार अहमद हलिमाझी, मलिक मोहंमद अली शिनवारी, फझल हादी, सफदर खाच, झहिद खाद, अब्दूल माजेद, आयाझ खान आणि सलामत शाह यांचा समावेश आहे. आंदोलकांनी मुख्य बाजारपेठ असलेल्या मिलन मंडी, चंदा, घलनाई आणि इक्काघुंडमध्ये तीव्र निदर्शने केली. स्थानिक राजकीय नेते आणि आदिवासी ज्येष्ठ नेत्यांनी आंदोलकांना संबोधित करताना सांगितले की, जिल्ह्याजवळ वारसाक आणि मोहमंद धरणे बांधली गेली, परंतु परिसरातील लोक विजेपासून वंचित आहेत. मोहंमद येथील जनतेला त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. मोहमंदची नैसर्गिक संपत्ती हिसकावून घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पॉवरग्रिड ब्रेकडाऊनमुळे अडचण ऊर्जा मंत्रालयाने पुष्टी केली की २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता राष्ट्रीय पॉवर ग्रिडची सिस्टम ब्रेकडाऊन झाले होते. यामुळे देशभरातील वीज प्रणालीमध्ये मोठा बिघाड झाला. एशियन लाइट इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, कराची, लाहोर, क्वेटा, पेशावर आणि इस्लामाबादसह संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीज खंडित झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.