आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगनचा गौप्यस्फोट:राजघराण्यात राहिले असते तर आत्महत्या केली असती, मुलाच्या वेगळ्या वर्णामुळे युवराज बनवण्याचा नियम बदलला

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या राजघराण्याची धाकटी सून मेगन मर्केलने गौप्यस्फोट केला आहे. ती म्हणाली, राजघराण्यात आल्यानंतर आपल्या स्वातंत्र्यावर खूप गदा आली. राजघराण्यात आयुष्य एकाकी होते. प्रसारमाध्यमांच्या ससेमिऱ्यामुळे मित्रांसोबत लंचलाही जाण्याचीही मुभा नव्हती. राजघराण्यातून बाहेर पडलेले ब्रिटनचे युवराज हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केलने रविवारी प्रख्यात अमेरिकी टीव्ही सेलिब्रिटी ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. मेगन म्हणाली, एक वेळ अशीही आली की मी पूर्णपणे कोसळून गेले होते. मला जगायचेच नव्हते, मनात आत्महत्येचे विचार भिरभिरत होते. इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती वाटत होती.

डचेस ऑफ ससेक्स मेगननुसार, ‘पती हॅरीने राजघराण्याबाबत जे सांगितले, तितकेच मला माहीत होते. लोकांना ही परीकथा वाटते. मात्र वास्तव त्यापेक्षा खूप वेगळे आहे.’ मर्केल म्हणाली, शाही विवाहाच्या तीन दिवसांआधीच आमचे लग्न झाले होते. १९ मे २०१८ ला झालेले शाही लग्न ही फक्त एक औपचारिकता होती. तो दिवस मी आणि हॅरीऐवजी जगासाठीच महत्त्वाचा होता याची मला जाणीव होती. थोरली जाऊ केटशी वादाबाबत मेगन म्हणाली, केट फ्लाॅवर गर्ल्सच्या कपड्यांवर खुश नव्हती. यामुळे मला रडू कोसळले होते. तथापि, यानंतर केटने मला पुष्पगुच्छ व संदेश पाठवून माफीही मागितली. मात्र मीच केटला रडवले, अशी बातमी पसरवण्यात आली. राजघराण्यावर विश्वास ठेवला हीच माझी सर्वात मोठी चूक होती. आम्हाला नेहमी सुरक्षित ठेवले जाईल, असे आश्वासन राजघराण्याने दिलेे होते. मात्र तसे घडले नाही.’

युवराज हॅरी म्हणाले, वडील चार्ल्स यांनी सर्वात जास्त नाराज केले. आर्थिक मदत बंद केल्यानंतर अशी वेळ आली की त्यांनी आमचे कॉलही उचलणे बंद केले. माझी आई प्रिन्सेस डायना जिवंत असती तर हे पाहून तिला खूप वेदना झाल्या असत्या. अशा वेळी राजघराणे पाठीशी उभे राहू शकले असते. मात्र कुणीच काही बोलले नाही हे जास्त वेदनादायक होते.’ लवकरच आपल्याला मुलगी होणार असल्याची सुवार्ता हॅरी-मेगनने मुलाखतीत दिली.

राजघराणे वर्णद्वेषी, मुलगा आर्ची श्वेतवर्णीय नसल्याने हक्क नाकारले
हॅरी-मेगनचा पुत्र आर्ची हा कृष्णवर्णीय तर निघणार नाही या भीतीने त्याला युवराजपद न देण्याची राजघराण्याची इच्छा होती. त्याच्या जन्मापूर्वी परिवाराने हॅरीशी चर्चा केली होती, हे भयंकर होते. मेगन म्हणाली, मी गरोदर असताना नियम बदलले गेले. या वृत्ताने मला हादरा बसला. कारण मुद्दा पदाचाच नव्हे, तर सुरक्षेचाही होता.

बातम्या आणखी आहेत...