आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Mental Illness In Children Due To Parental Depression, A Study By Experts At The University Of Bristol

लंडन:माता-पित्याच्या नैराश्यामुळे मुलांत मानसिक आजार, ब्रिस्टल विद्यापीठातील तज्ज्ञांचा अभ्यास

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या महिला गर्भावस्थेदरम्यान नैराश्यात राहतात, त्यांच्या मुलांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. मोठे झाल्यानंतर या मुलांत नैराश्याची जोखीम त्यांच्या समवयीनांच्या तुलनेत जास्त असते. ब्रिस्टल विद्यापीठातील तज्ज्ञांनी एका अभ्यासाच्या आधारे हा दावा केला. तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीनंतर महिला नैराश्यात असली तर मुलामध्ये ही जोखीम आणखी वाढते. गर्भावस्था आणि मुलाच्या जन्मानंतरही माता-पित्याने आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे किती आवश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या अभ्यासाद्वारे करण्यात आला आहे. १४ वर्षे हा अभ्यास चालला. त्यादरम्यान ५ हजारपेक्षा जास्त मुलांचे वय २४ वर्षे होईपर्यंत त्यांच्या मानसिक आरोग्याचे नियमित ट्रॅकिंग करण्यात आले. त्यात असे आढळले की, ज्यांच्या मातांना प्रसूतीनंतर नैराश्याचा सामना करावा लागला अशा मुलांची किशोरावस्थेतील नैराश्याची स्थिती आणखी वाईट झाली. त्या तुलनेत ज्या महिलांना गर्भावस्थेदरम्यान मानसिक त्रास झाला, त्यांच्या मुलांत नैराश्याची पातळी सरासरीएवढी होती. ज्या मुलांच्या मातांत दोन्ही काळात नैराश्य होते, अशा मुलांना सर्वाधिक मानसिक त्रास झाला.

‘बीजे साइक ओपन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित निष्कर्षानुसार, मुलींमध्ये त्याचा परिणाम जास्त होतो. या अभ्यासाच्या लेखिका डॉ. प्रिया राजगुरू यांच्या मते, वडील नैराश्यात असल्याचा परिणामही मुलांवर होतो. पण हे फक्त एका अवस्थेतील नैराश्य असल्याने मुलांवर कमी परिणाम होतो. किशोरावस्थेत मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी माता-पित्याला मुलाच्या जन्माआधी प्रयत्न करावे लागतील.

रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रिस्टचे डॉ. जोआन ब्लॅक म्हणाले की, आई-वडिलांवर परिणाम झाला असेल तर मुलांनाही भविष्यात मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. त्यातील चांगली गोष्ट म्हणजे यावर उपचार होऊ शकतात. फक्त लवकर मदत घेण्याची गरज आहे. रॉयल कॉलेजच्या ताज्या अंदाजानुसार, कोरोना काळात १६ हजारांपेक्षा जास्त महिलांना प्रसूतीनंतर आवश्यक मदत मिळू शकली नाही. त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. तज्ज्ञांच्या मते, हा अभ्यास महत्त्वाचा आहे. एनएचएसला त्यामुळे प्राधान्य निश्चित करण्यास मदत होईल.

रोज २ हजारपेक्षा जास्त किशोरवयीन मुले नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (एनएचएस) मानसिक आरोग्य सेवेची मदत घेत आहेत. यावरून त्यांचे मानसिक आरोग्य किती बिघडले आहे याचा अंदाज करता येतो. एनएचएसच्या आकड्यांनुसार फक्त एप्रिल ते जूनदरम्यान १८ वर्षांखालील १.९ लाख किशोरांना एनएचएच मानसिक आरोग्य सेवेकडे रेफर करण्यात आले. रॉयल कॉलेजच्या तज्ज्ञांच्या मते, या मुलांवर आधीपासूनच दबाव होता, कोरोनामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...