आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यूएईत पारा 51 अंशांवर; पोलिसांचा इशारा-मुलांना वाहनात एकटे सोडल्यास पालकांना 10 वर्षांची कैद, 2 कोटी रुपये दंड होणार

दुबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उष्णतेचा 7 वर्षांचा विक्रम मोडीत, मेच्या तुलनेत तापमान 2-3 अंश जास्त; तीन दिवसांत दोन वेळा ही घटना

संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) सध्या उष्णतेचा कहर सुरू आहे. रविवारी अल एेनच्या स्वीहानमध्ये पारा ५१.८ अंश सेल्सियसवर गेला. हा या ऋतूतील सर्वात उष्ण दिवस ठरला. गेल्या शुक्रवारीही येथे पारा ५१ अंश होता. त्याबाबत राष्ट्रीय हवामानशास्त्र केंद्राच्या (एनसीएम) प्रवक्त्याने सांगितले की, मेच्या तुलनेत जूनमध्ये तापमान २-३ अंश वाढले आहे. यूएईत हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष असेल का, हे सध्या तरी सांगता येणार नाही. याआधी जुलै २००२ मध्ये पारा ५२.१ अंशांवर पोहोचला होता. पण तो तीन दिवसांत २ वेळा ५१ अंशांवर जाणे ही नवीन घटना आहे.

यूएईचे खगोलशास्त्रज्ञ हसन-अल-हरिरी म्हणाले की, एवढी प्रचंड उष्णता ही आश्चर्यकारक घटना आहे, पण दर ११ वर्षांनी होणाऱ्या सूर्याच्या घडामोडींशी तिचा संबंध जोडता येऊ शकत नाही. २०२० पासून सूर्याशी संबंधित या घडामोडी घडत आहेत. पण आकडेवारी आणि विश्लेषण न करता तेच या उष्णतेचे कारण आहे, असे म्हणता येणार नाही. ५५ वर्षीय हरिरी म्हणाले की, आमच्या लहानपणी म्हणजे ७० च्या दशकात येथे एवढी प्रचंड उष्णता नसायची. ९० च्या दशकापासून मात्र तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

वाढत्या तापमानामुळे यूएईत पोलिस आणि प्रशासनानेही तयारी केली आहे. आई-वडिलांनी किंवा पालकांनी कुठल्याही कारणास्तव मुलांना वाहनात एकटे सोडले तर हा दंडनीय गुन्हा असेल. अशा लोकांना १० वर्षांची कैद आणि १० लाख डिरहम ( २ कोटी रु.) पर्यंतचा दंड सुनावला जाऊ शकतो, असा इशारा अबू धाबी पोलिसांनी दिला आहे.

बाहेर पारा ४० अंश, तर वाहनाच्या आत ६० अंशांपर्यंत राहू शकतो : तज्ज्ञ
तज्ज्ञांच्या मते, एवढ्या तापमानात मुलांना वाहनांत सोडणे प्राणघातक ठरू शकते. कारण बाहेर तापमान ४० अंश असले तर १० मिनिटांतच वाहनाच्या आतील तापमान ६० अंशांपर्यंत पोहोचू शकते. उष्माघात आणि गुदमरल्यामुळे मुलांचा मृत्यू होऊ शकतो. सरकारी नोंदींनुसार, दरवर्षी सरासरी ४० मुलांचा मृत्यू या कारणामुळे होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५५% आई-वडिलांना या धोक्याची जाणीवच नसते.

जुने टायर बदलण्याचे निर्देश
उष्णतेमुळे टायर फुटण्याचे अपघात लक्षात घेऊन ‘समर-सेफ-ट्रॅफिक’ मोहिमेअंतर्गत, अबुधाबी पोलिसांनी चालकांना टायरची तपासणी करू घेण्यास सांगितले आहे. अपघात टाळण्यासाठी जुने टायर बदलावेत, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसारच टायर वापरण्यात यावेत, असेही चालकांना सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...