आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्यानमार लष्कराने मंगळवारी केलेल्या हवाई हल्ल्यात 50 जण ठार झाले. मृतांत 15 महिला व अनेक मुलांचा समावेश आहे. अल जजीराच्या वृत्तानुसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
लष्कराने बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पाजीगी भागात हा हल्ला केला. हा भाग सागेंग प्रांतात आहे. हल्ल्यावेळी काही नागरिक एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गोळा झाले होते. 2 वर्षांपूर्वी झालेल्या तख्तापालटानंतर लष्कराने केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
प्रथम बॉम्बफेक, नंतर गोळीबार
बीबीसीला हल्ल्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, सकाळी 7 वा. गावात लष्कराचे एक जेट आले. त्यातील एकाने बॉम्ब टाकला. त्यानंतर अनेक हेलिकॉप्टरमधून गोळीबार सुरू झाला. हा गोळीबार जवळपास 20 मिनिटे सुरू होता.
या भागात राहणाऱ्या अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यात सर्वत्र मृतांचा खच दिसून येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्यांनी मृतदेह मोजणे सुरू केले आहे. पण त्यांच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडल्यामुळे ते मोजण्यात अडचण येत आहे.
2022 मध्ये हवाई हल्ल्यात 460 जणांचा मृत्यू
द गार्डियनच्या वृत्तानुसार, म्यानमारमधील हवाई हल्ले नित्याची गोष्ट बनली आहे. आपल्या शत्रूंचा माग काढण्यासाठी लष्कर कोणतीही कसर सोडत नाही. यामुळे ते सर्वसामान्यांना टार्गेट करत आहे. म्यानमार विटनेसच्या वृत्तानुसार, गत 6 महिन्यांत अशा 135 घटना घडल्या.
1 फेब्रुवारी रोजी म्यानमारमधील सत्तापालटाला 2 वर्षे झाली. 2021 मध्ये लष्कराने तेथील निवडून आलेले आंग सान स्यू की यांचे सरकार पाडले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तेव्हापासून नागरिक वेगवेगळ्या मार्गाने लष्कराविरोधात निदर्शने करत आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, सैन्याला जमिनीवरून ही निदर्शने मोडून काढणे अवघड जात आहे. त्यामुळे त्यांनी आता आकाशातून विरोधकांवर हल्ले सुरू केलेत.
म्यानमारच्या ईरावडी न्यूज वेबसाईटनुसार, गत 2 वर्षांत येथील 31022 जणांचा बळी गेला आहे. यापैकी 460 जण एका वर्षात झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झाले. हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांत बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यांमुळे तब्बल 11 लाख लोकांवर आपले घरदार सोडण्याची वेळ आली आहे.
मीडिया पोर्टल द ईरावडीनुसार, म्यानमारमध्ये 40 वर्षांनंतर गतवर्षी जुलैमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. सरकारने नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे खासदार फ्यो जेया थॉ यांच्यासह अन्य दोघांना फाशी दिली. एका अंदाजानुसार, म्यानमारच्या लष्कराने एका वर्षात सुमारे 100 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
चीन - रशियन लढाऊ विमानांचे हल्ले
संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, म्यानमार आपल्याच नागरिकांना ठार मारण्यासाठी वेगाने शस्त्रसाठा वाढवत आहे. निर्बंधांमुळे म्यानमार इतर देशांकडून शस्त्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे तो स्वतःची शस्त्रे बनवत आहे.
भारत, अमेरिका व जपानसह 13 देशांतील कंपन्या याकामी म्यानमारला मदत करत आहेत. बीबीसीने आपल्या एका वृत्तात म्यानमार हल्ल्यांसाठी चिनी व रशियन बनावटीची शस्त्रे वापरत असल्याचा दावा केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.