आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात राजकीय घमासान:हॉटेलच्या रूमचा दरवाजा तोडून नवाज शरीफांचा जावई सफदरला अटक; विरोधकांनी जिनांचा अपमान केल्याचा इम्रान सरकारचा आरोप

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराचीमध्ये अटक झाल्यानंतर नवाझ शरीफांचे जावई सफदर
  • सरकार : मंत्री म्हणाले, सफदर यांची अटक म्हणजे कायद्याचा सन्मान

मोहंमद जिनांच्या कबरीचा अपमान केल्याचा आरोप ठेवत पाकमध्ये पोलिसांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफांचे जावई कॅप्टन (निवृत्त) मोहंमद सफदर यांना अटक केली आहे. याशिवाय शरीफ यांची मुलगी मरियमसह सुमारे २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र एक लाख पाकिस्तानी रुपयांच्या बाँडवर संध्याकाळी सफदर यांना जामीन मंजूर करण्यात आला. जिनांच्या कबरीशी संबंधित सरकारी मालमत्तेचे या लोकांनी नुकसान केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मरियम सोशल मीडियावर म्हणाल्या, स्थानिक पोलिस कराचीतील हॉटेलमध्ये माझ्या खोलीत घुसले, पोलिसांनी माझे पती सफदर यांना अटक केली. तसेच पोलिसांनी माझ्या खोलीत घुसून तोडफोड केल्याचा आरोप मरियम यांनी केला. हा गुन्हा वकास अहमद खान या स्थानिक व्यक्तीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. विरोधी आघाडी पीडीएमने रविवारी कराची बाग-ए-जिना ग्राउंडमध्ये मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी झालेल्यांनीच तोडफोड केल्याचा सरकारचा आरोप आहे.

सरकार : मंत्री म्हणाले, सफदर यांची अटक म्हणजे कायद्याचा सन्मान

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, कॅप्टन सफदर यांना झालेली अटक कायद्याच्या सन्मानाचे उदाहरण आहे. कायदे आझम मोहंमद अली जिना यांची कबर असलेल्या ठिकाणी घाणेरडे राजकारण करण्याची जागा नाही. हे ठिकाण प्रत्येक पाकिस्तानीसाठी पवित्र ठिकाण आहे. अशा ठिकाणी घोषणाबाजी करणे आणि बेजबाबदार वर्तणूक कायद्याच्या विरोधात आहे. यामुळे आरोपींना शिक्षा व्हायला हवी.

पीओके : कार्यकर्ते म्हणाले, इम्रान यांच्या हातातून निसटली कराची

पीओकेचे नेते आणि कार्यकर्ते अमजद अय्युब मिर्झा यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, कराचीतील विरोधी आघाडी पीडीएमची भव्य रॅली इम्रानसाठी मोठे आव्हान आहे. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाल्याने इम्रान यांच्या हातातून कराची निसटल्याचे स्पष्ट होत आहे. २०१८ च्या निवडणुकीत कराचीमधून इम्रान यांना मोठी बढत मिळाली होती. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने येथे १४ जागा जिंकल्या होत्या. बलुची नेत्यांची भाषणेही झाली होती.

३० दिवस : शरीफांचे भाऊ, मुलगी, जावयासह समर्थकांवर पकड घट्ट

> २० सप्टेंबर : इम्रान सरकारविरोधात पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटची स्थापना.

> २८ सप्टेंबर : नवाझांचे छोटे भाऊ शाहबाज शरीफ मनी लाँडरिंगप्रकरणी अटकेत.

> १ ऑक्टोबर : नवाझ शरीफ, मरियमसह ४० जणांवर इस्लामाबादेत देशद्रोहाचा खटला.

> १६ ऑक्टोबर : सरकारविरोधात गुजरावालांत पहिली रॅली. ४५० जण ताब्यात.

> १८ ऑक्टोबर : कराचीच्या बाग-ए-जिना मैदानात विरोधी आघाडीची दुसरी रॅली.

> १९ ऑक्टोबर : नवाझ शरीफांचे जावई सफदर अटकेत. २०० जणांवर गुन्हा.