आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्करी मुत्सद्देगिरी:भारताशी संबंध बिघडवून चीनशी जवळीक साधण्यास नेपाळचे लष्कर अनुत्सुक, नरवणे काठमांडूला जाणार

परशुराम काफले | काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वर्षांचे मतभेद संपुष्टात येण्याच्या मार्गावर, नेपाळसोबतच्या संबंधांची कहाणी

नवीन राज्यघटना, नकाशांबाबतचा गैरसमज या शृंखलेत अडकलेले भारत-नेपाळचे संबंध आता सुधारण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे ‘लष्करी मुत्सद्देगिरी’मुळे हे शक्य झाले आहे. नेपाळच्या राजकीय नेत्यांची वक्तव्ये भलेही कठोर असली तरी दोन्ही देशांच्या लष्करांदरम्यानचे संबंध कधीच बिघडले नाहीत. अलीकडेच भारताचे ‘रॉ’ प्रमुख सामंतकुमार गोयल यांचा दौरा आणि आता ४ नोव्हेंबरला भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचा नेपाळ दौरा द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे. नेपाळमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, नेपाळचे लष्कर विशेषत: लष्करप्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा यांच्या प्रयत्नांमुळे हे घडले आहे. नेपाळमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत रस्सीखेचीमध्ये चीनचा हस्तक्षेप असला तरी भारताशी संबंध खराब करून चीनशी जवळीक साधण्यास नेपाळी लष्कर उत्सुक नाही. भारत-चीन प्रकरणी तटस्थ राहण्याची नेपाळची इच्छा आहे. नरवणेंच्या दौऱ्यानंतर परराष्ट्रमंत्री किंवा परराष्ट्र सचिवांचा दौराही होऊ शकतो.

नेपाळ लष्कराच्या एका वरिष्ठ मेजर जनरलनुसार, दोन्ही देशांनी सर्व स्तरांवर पुन्हा चर्चा सुरू करावी, त्यामुळे गैरसमज दूर होतील आणि तिसऱ्या देशाला हस्तक्षेपाची संधी मिळणार नाही, या मुद्द्यावर भारत आणि नेपाळच्या लष्करप्रमुखांचे एकमत झाले आहे. चर्चेसाठी पुढाकार घेणाऱ्या थापा यांच्या मते, भारत आणि चीनच्या वादात नेपाळ तटस्थ आहे हा स्पष्ट संदेश देण्याची वेळ आलेली आहे. नेपाळच्या दौऱ्यात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी ५ नोव्हेंबरला नरवणे यांना नेपाळ लष्कराचे मानद लष्करप्रमुख म्हणून सन्मानित करतील. दोन्ही देशांचे लष्करप्रमुख परस्परांच्या लष्कराचे मानद लष्करप्रमुख असतात, अशी परंपरा आहे. त्यासोबतच चर्चा प्रक्रियाही सुरू होईल. नरवणे हे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आणि समकक्ष जनरल थापांशीही चर्चा करतील.

डोभाल येतील अशी ओलींची अपेक्षा होती, पण भारताने रॉ प्रमुखांना पाठवले

जून महिनाअखेरीस नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल यांच्यातील अंतर्गत वाद सर्वोच्च स्तरावर होते. पण नेपाळमधील चिनी राजदूताच्या मदतीने ओलींनी ते मिट‌वले. ओलींनी पक्षात आपली स्थिती मजबूत केली आणि भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला. ओलींनी पंतप्रधान मोदींशी १५ ऑगस्टला चर्चा केली. औपचारिक चर्चा सुरू करावी यावर दोन्ही बाजूंची सहमती आहे. त्यानंतर भारताचे एनएसए डोभाल किंवा परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगलांचा दौरा होईल, अशी ओलींची अपेक्षा होती, पण आधी रॉ प्रमुखांना आणि नंतर लष्करप्रमुखांना पाठवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.