आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डिसेंबरच्या गारठलेल्या दुपारीही शांघायच्या हुआंगपू जिल्ह्यातील घटस्फोट नाेंदणी कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. येथे घटस्फोटासाठी येणाऱ्या दांपत्यांचा आकडा दुप्पट झाला आहे. सामान्य दिवशी येथे रोज सरासरी २० जोडपी यायची. आता हा आकडा आता ४० ते ५० वर गेला आहे. ग्वांगझू व शेंनझेन प्रांतांतही घटस्फोटाच्या अपॉइंटमेंटचे स्लॉट फुल्ल आहेत. अनेक जिल्ह्यांत सकाळपासून रांगा लागत आहेत. या सर्वांना ३१ डिसेंबरआधीच ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
चीनमध्ये १ जानेवारी २०२१ पासून पहिला सिव्हिल कोड लागू होत आहे. त्याला याच वर्षी चीनच्या संसदेने मंजुरी दिली होती. काडीमोडाची वाढती प्रकरणे बघता त्यात नवा नियम जोडला आहे. पुढील वर्षापासून अर्जदार दांपत्यांना एका महिन्याचा कूल-ऑफ पीरियड व्यतीत करावा लागेल. या काळात पती किंवा पत्नीचे मन:परिवर्तन झाले तर अर्ज रद्द होईल. सध्याच्या नियमात अर्जाच्या दिवशीच तत्काळ घटस्फोट मिळतो. त्यामुळे नव्या नियमावरून लोकांमध्ये नाराजी आहे.
चीनमध्ये मोडकळीस आलेले संसार पुन्हा सावरण्याच्या या नव्या उपायांवर राजकीय सल्लागार मंडळाच्या माजी सदस्या शांग शाओहुआ म्हणाल्या, ‘तावातावात होणारे घटस्फोट रोखणे हा नव्या नियमाचा उद्देश आहे. विशेषकरून एक मूल धोरणातून जन्मलेल्या तरुण दांपत्यांसाठी. अनेक जोडपी रात्रभर भांडतात अन् सकाळी तडक घटस्फोट घेतात. दुपारनंतर त्यांना पश्चात्तापही हाेतो.’ शांग यांनीच २०१० मध्ये सर्वप्रथम कूलिंग-ऑफ पीरियडचा प्रस्ताव दिला होता. दरम्यान, चायनीज अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक वू झिओयिंग म्हणाले, ‘२०१५ मध्ये एक जोडपे-एक मुलाचे धोरण संपुष्टात आणल्यानंतरही चीनचा जन्मदर वाढलेला नाही. विवाहविच्छेद हेही त्यामागील मोठे कारण आहे.
गतवर्षी ४७ लाख जोडप्यांचा काडीमोड, महिला आघाडीवर
चीनमध्ये २०१९ मध्ये ४७ लाख जोडप्यांनी काडीमोड घेतला. ७४% प्रकरणांत महिलांनीच पुढाकार घेतला. तज्ज्ञांनुसार, महिलांमधील व्यक्तिस्वातंत्र्याचे विचार आणि लग्नाबाबत बदललेली विचारसरणी हे त्यामागील कारण आहे. २०१९ मध्येच जन्मदर घसरून गेल्या ७ दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.