आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत दोन-दोन लसींचा उपयोग केला जात आहे. पहिल्या टप्प्यात पात्रता यादीत असलेल्या लोकांना लस दिली जात आहे. यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व वृद्धांचा समावेश आहे. मात्र यानंतरही न्यूयॉर्क राज्यात लस घेण्यासाठी कमी लोक येत असल्याने अनेक डोस खराब होत असल्याने ते टाकून द्यावे लागत आहेत. परिणामी हे टाळण्यासाठी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरणाच्या नियमात सूट देण्यात आली. दरम्यान, आघाडीवरील कर्मचारी नसलेल्यांनादेखील लस देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये औषधी दुकानावर काम करणारे तसेच रुग्णालयातील कॅशियरचाही समावेश आहे. तत्पूर्वी शनिवारी नियमांमध्ये सूट देत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. यात शिक्षकांचाही समावेश झाला होता.
अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले होते. यानंतर सरकारने नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला.
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगाला लसीची प्रतीक्षा आहे. अनेक देशांचे लक्ष भारताकडे आहे. ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिकेसह १० पेक्षा जास्त देशांनी भारताकडे लसीची मागणी केली आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, लस वितरणात भारताकडून आशियाई देशांना प्राधान्य दिले जाऊ शकते. यात बांगलादेश, भूतान, नेपाळसारख्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य दिले जाऊ शकते. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनुसार, अनुराग श्रीवास्तव म्हणाले, भारत सुरुवातीपासूनच कोरोनाविरोधातील लढाईत अग्रेसर राहिला आहे. आम्ही सहकार्यासाठी कायम तत्पर आहोत.
ब्रिटनमध्ये पुन्हा ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले
ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. रविवारी ब्रिटनमध्ये ५४,९४० नवे रुग्ण आढळले, तर ५६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत रविवारी २,१३,४५३ रुग्ण आढळले. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे, मृत्यूंचे प्रमाण हे दोन हजारांपेक्षा कमी होते. रविवारी एकूण १७९२ मृत्यू झाले होते. भारतात रविवारी १६,०८५ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १५० रुग्णांनी प्राण गमावले. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्येही स्थिती बिघडत आहे. तेथे २९,७९२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ४८३ रुग्णांनी प्राण गमावले. रशियामध्ये कोरोनाचे नवे स्वरूप आढळले. तेथे २२,८५१ नवे रुग्ण आढळले, तर ४५६ जणांचा मृत्यू झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.