आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागत काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या पाकिस्तानात रविवारी मोठे राजकीय नाट्य घडले. विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकार विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव नॅश्नल असेंब्लीच्या उपसभापतींनी धूडकावून लावला. यासाठी त्यांनी परदेशांनी रचलेले कथित कट कारस्थान व राज्यघटनेतील कलम 5 चा दाखला दिला. त्यानंतर लागलीच संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. या घटनाक्रमानंतर इम्रान यांनी देशाला केलेल्या एका संक्षिप्त संबोधनात संसद भंग करण्याची घोषणा केली. यासंबंधी त्यांनी पाठवलेला एक प्रस्ताव राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी तत्काळ मान्य केला. यामुळे पाकिस्तानात 90 दिवसांच्या आत सार्वत्रिक निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तूर्त, इम्रान काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पाकचा राज्यशकट हाकतील.
विरोधकांनी रचले होते कट कारस्थान
इम्रान यांनी आपल्या भाषणात विरोधकांनी परदेशी सरकारच्या मदतीने आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला. 'विरोधकांनी दुसऱ्या देशांच्या मदतीने आमचे सरकार उलथावून टाकण्याचा कट रचला होता. पण, सभापतींनी तो हाणून पाडला. आता सरकार जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागेल. जनतेने निवडणुकांची तयारी करावी,' असे ते म्हणालेत. 'सभापतींनी विरोधकांचा अविश्वास फेटाळला. याबद्दल देशाला देशाला शुभेच्छा. काल सर्वजण हैराण झाले होते. पुढे काय होईल असा प्रश्न मला विचारत होते. कुणीही घाबरू नये, असे मी त्यांना सांगेन. आज सभापतींनी आपल्या घटनात्मक अधिकारांतर्गत निर्णय घेतला. त्यानंतर मी राष्ट्रपतींना संसद भंग करण्याची शिफारस केली. विरोधकांनी संपूर्ण समाजाचा विश्वासघात करण्याचा कट रचला होता,' असे इम्रान यावेळी म्हणाले.
इम्रान यांनी केला देशद्रोह
विरोधी पक्षांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार शाहबाज शरीफ यांनी इम्रान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. इम्रान यांनी पाकला अराजकतेकडे लोटले आहे. त्यांचे कृत्य देशद्रोहाहून कमी नाही. संविधानाचे खूलेआम उल्लंघन करण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधक मागणार सुप्रीम कोर्टात दाद
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सभापतींच्या अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचीही घोषणा केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान यांच्यावर संविधानाची अवहेलना केल्याचा आरोप केला आहे. 'पंतप्रधान इम्रान यांनी संविधानाचे उल्लंघन केले आहे. विरोधक याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागतील. तसेच संपूर्ण विरोधी पक्ष संसदेत धरणे आंदोलन करतील', असे ते म्हणाले.
सभापतींवर पक्षपातीपणाचे आरोप
तत्पूर्वी, विरोधी पक्षांनी संसदेचे सभापती असद कैसर यांच्याविरोधात अविश्वसाची नोटीस दिली होती. कैसर तटस्थपणे काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर कैसर यांनी संसदीय कामकाजापासून अंतर राखले. त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती कासिम सुरी यांनी नॅश्नल असेंब्लीची धूरा वाहिली. त्यांनी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचा दाखला देत धूडकावून लावला. वाढत्या तणावामुळे राजधानी इस्लामाबादसह देशातील सर्वच महत्वाच्या शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दुसरीकडे, शनिवारी रात्री इम्रान यांनी आपल्या निवासस्थानी समर्थक खासदारांची बैठक बोलावली होती. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या बैठकीला अवघे 142 खासदार पोहोचले होते. दुसरीकडे, विरोधकांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटीक फ्रंट किंवा पीडीएमच्या खासदारांचा आकडा 200 च्यावर पोहोचला आहे. म्हणजे इम्रान यांनी बहुमत गमावले हे स्पष्ट आहे.
पाकशी संबंधित अन्य महत्वाचे अपडेट्स
हिंसाचाराची भीती
अविश्वास प्रस्तावावर मतदानापूर्वी राजधानी इस्लामाबादेत सुरक्षा यंत्रणांना अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे. जवळपास 3 हजार पोलिस कर्मचारी संसद परिसरात तैनात करण्यात आलेत. याशिवाय रेंजर्सलाही स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. एकीकडे इम्रान खान समर्थक राजधानीत गोळा होत आहेत. तर दुसरीकडे, विरोधकांनीही आपल्या पाठिराख्यांसह कंबर कसली आहे. यामुळे इस्लामाबादेत हिंसाचार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.