आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Nobel Peace Prize Awarded To Belarusian Human Rights Activist Ales Baliatsky, Russian And Ukrainian Human Rights Organizations

विशेष:बेलारूसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बालियात्स्की, रशिया आणि युक्रेनच्या मानवाधिकार संघटनांना शांततेचे नोबेल जाहीर

ओस्लो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलारूस, युक्रेन आणि रशियातील मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना या वर्षाचा शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाईल. ओस्लो येथील नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी बेलारूसचे मानवाधिकार अधिवक्ता अॅलेस बालियात्स्की, रशियाची मानवाधिकार संघटना ‘मेमोरियल’ आणि युक्रेनची मानवाधिकार संघटना ‘सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज’ यांना पुरस्कार देण्याची घोषणा केली. या पुरस्काराप्रीत्यर्थ सुमारे ७३ कोटी रुपयांची रक्कम मिळते.

समितीने म्हटले आहे की, अॅलेस आणि या दोन्ही संघटना आपापल्या देशांत सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी ‘सत्तेवर टीका करण्याच्या अधिकारा’ला प्रोत्साहित करण्याचे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाचे काम केले. त्यांनी युद्ध गुन्हे, मानवाधिकारांचे हनन आणि सत्तेच्या दुरुपयोगाच्या दस्ताऐवजीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ते शांतता आणि लोकशाहीसाठी नागरिक समाजाचे महत्त्व प्रदर्शित करतात. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार रशियाच्या प्रभुत्ववादी धोरणांवर निशाणा साधणारा असे मानले जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ७० व्या वाढदिवशीच त्याची घोषणा झाली आहे. तथापि, समितीने म्हटले की, ‘हा पुरस्कार रशिया अथवा पुतीन यांच्याविरुद्ध नव्हे, तर या देशांत मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्धच्या कामाला सन्मानित करण्यासाठी देण्यात आला आहे.’

अॅलेस बालियात्स्की : आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी झाली होती अटक अॅलेस बेलारूसमध्ये १९९६ पासून मानवाधिकार उल्लंघनावर नजर ठेवत असलेल्या ‘व्हियासना’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेन्को यांनी घोटाळे करून २०२० च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्याचा आरोप झाला होता. त्याविरोधात विरोधकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान अॅलेस यांना अटक करण्यात आली होती. व्हियासना या संघटनेवर बेलारूसमध्ये एक प्रकारे बंदी आहे.

सेंटर फाॅर सिव्हिल लिबर्टीज, युक्रेन ही संघटना नागरिकांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करत आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युद्ध गुन्ह्यांचे रेकाॅर्ड तयार करत आहे. संस्थेचे प्रमुख अॅलेक्झांड्रा मॅत्विचुक यांनी म्हटले आहे की, आम्ही आतापर्यंत जवळपास १९,००० युद्ध गुन्ह्यांचा डेटाबेस तयार केला आहे.

रशियाची मानवाधिकार संघटना ‘मेमोरियल’ एकेकाळच्या सोव्हिएत संघात १९८७ मध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे या संघटनेची स्थापना करण्यात आली. ती कम्युनिस्ट शासनात झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाचे मुद्दे उपस्थित करते. दहशतवादाविरुद्ध आणि मानवाधिकारांना प्रोत्साहित करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...