आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​फेसबुक उपकार करत नाही, वेळ आल्यावर धडा शिकवू; अमेरिकेमध्ये लॉग आऊट फेसबुक मोहीम, झुकेरबर्गनी राजीनामा द्यावा - विरोधक गटांची मागणी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युजर्सच्या डेटाच्या मदतीनेच कंपनीला 98.5% उत्पन्न मिळते

दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या धोरणांमुळे नाराज युजर्सनी कंपनीविरोधात ‘लॉग आऊट’ मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना १० नोव्हेंबरला हे दोन्ही प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याची विनंती केली जात आहे. मोहिमेसाठी एकजूट गटांचे म्हणणे आहे की, याद्वारे फेसबुकला तिच्या बेजबाबदार वर्तणुकीची जाणीव करून दिली जाईल. अमेरिकी संसदेवर हल्ला आणि त्यावरील कंपनीची भूमिका, कंपनीतील घोटाळे आणि फायद्यासाठी दुष्प्रचाराकडे दुर्लक्ष करण्याच्या मुद्द्यावर युजर्समध्ये नाराजी आहे. इन्स्टाग्रामचा मुलींच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होत होता हे माहीत असूनही फेसबुकने काही केले नाही, असे अलीकडेच स्पष्ट झाले होते.

मानवाधिकार हननाच्या घटनांशी संबंधित पोस्टवरही कंपनीने कठोर कारवाई केली नाही. १० नोव्हेंबरला दोन्ही प्लॅटफॉम वापरू नका, असे आवाहन तंत्रज्ञान विश्वातील मनमानीला विरोध करणाऱ्या गटांपैकी एक असलेल्या कॅरोजने युजर्सना केले आहे. झुकेरबर्ग यांनी राजीनामा द्यावा आणि इन्स्टाग्राम फॉर किड्स प्रकल्प तत्काळ रोखावा, अशी मागणीही कॅरोजने केली आहे. ‘लॉग आऊट’ मोहिमेचे संचालक जेलानी ड्रू म्हणाले की, फेसबुक सर्वत्र आहे, त्यामुळे मोहिमेची पोस्टही फेसबुकवरच केली.

केम्ब्रिज अॅनालिटिकानंतर ‘डिलीट फेसबुक’ मोहीम सुरू झाली होती. कंपनीचे शेअर घसरले होते. पण लवकरच परिस्थिती पूर्ववत झाली. ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर्स आंदोलनाच्या वेळी फेसबुकचे सीईओ झुकेरबर्ग यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘व्हेन द लूटिंग बिगिन्स, शूटिंग बिगिन्स’ ही पोस्ट हटवण्यास नकार दिल्यानंतर फोर्ड आणि कोका कोला यांसारख्या १००० कंपन्यांनी फेसबुकवर जाहिराती रोखल्या होत्या. त्यामुळे नुकसान झाले, पण कंपनीने लवकरच रिकव्हरी केली. असे प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील, तेव्हाच युजर्सची ताकद कळेल, असे या गटांचे म्हणणे आहे.

युजर्सच्या डेटाच्या मदतीनेच कंपनीला ९८.५% उत्पन्न मिळते
कॅरोजच्या सीईओ मारियाना रुइझ म्हणाल्या,‘प्लॅटफॉर्मवर जागा दिल्याने युजर्सनी त्यांचे उपकार मानावे असे फेसबुकसारख्या कंपन्यांना वाटते. पण स्थिती उलट आहे. फेसबुकचा हा गैरसमज आहे. वेळ आल्यावर आम्ही कंपनीला दाखवून देऊ. कंपनीला ९८.५% उत्पन्न जाहिरात व्यवसायातून मिळते, हे तिच्या ताज्या अहवालावरून स्पष्ट होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर युजर्सचा डेटा वापरला जातो. युजर्स कोणत्या जाहिरातीवर क्लिक करू शकतात हे त्यावरून कळते. त्यानंतर कंपन्यांना जाहिरातीची जागा विकून फेसबुक अमाप कमाई करते.’ ‘अकाउंटेबल टेक’ या अॅडव्होकेसी समूहाचे ऋषी भरवानी म्हणाले की, युजर्स प्लॅटफॉर्मवर जाणेच बंद करतील तेव्हा काय होईल, याचा अंदाजच कंपनीला आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...