आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरपराक्रम:लादेनला मारण्यासाठी गेलेले अमेरिकन कमांडो थोडक्यात बचावले, लादेनला संपवताच ओरडले ‘जेरोनिमो’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तारीख- 1 मे 2011. वेळ- रात्री 11:30 वा. अफगाणिस्तानच्या जलालाबाद एअरफील्डवरून 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाकिस्तानच्या दिशेने झेपावले. यूएस नौदलाच्या 23 कमांडोंसह एक दुभाषी अहमद व बुलेट प्रुफ जॅकेट घातलेला बेल्जियन शेफर्ड वंशाचा कुत्रा कॅरियोही होता.

दोन्ही हेलिकॉप्टर्स दिवे न लावता व हलक्या आवाजात पाकच्या पर्वतरांगांवरून उड्डाण केले. रेडिओ संप्रेषणही कमीत कमी ठेवण्यात आले. विमानातही जवळपास शांतता होती.

टेक ऑफ केल्यानंतर 15 मिनिटांत दोन्ही हेलिकॉप्टर पाकच्या हद्दीत शिरले. पाकच्या सीमेपासून 120 मैल अंतरावर असलेल्या अबोटाबाद शहरातील एका घरात राहणाऱ्या कुख्यात ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी हे सर्वजण निघाले होते.

दोन्ही ब्लॅक हॉक वायव्येकडून अबोटाबादमध्ये घुसले. त्यांनी लादेनच्या घरावर घिरट्या घातल्या. मार्क नामक एक चीफ पेटी ऑफिसर हेलिकॉप्टरच्या गेटवर गुडघ्यांवर बसला होता. पाठीमागे 11 कमांडो हातात ग्लोव्हज घालून दोरीच्या मदतीने ओसामाच्या घरावर उतरण्यासाठी सज्ज होते. ते मार्कच्या इशाऱ्याची वाट पाहत होते.

लादेनच्या घराबाहेर पोहोचताच पायलटने हेलिकॉप्टर थोडेसे खाली आणले. एव्हाना त्याला एखाद्या या अप्रिय घटनेची कल्पना आली होती. हेलिकॉप्टरचा मागचा भाग ओसामाच्या घराच्या बाहेरील भिंतीला धडकला. त्यात बसलेले 11 कमांडो थोडक्यात बचावले. सैनिकांनी लगेच प्लान-बी सक्रिय केला आणि पुढच्या काही मिनिटांतच ओसामा बिन लादेनला ठार केले.

आज या घटनेला 12 वर्षे झाली. चला तर मग आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पाहूया ओसामा बिन लादेनचा शोध व त्याच्या हत्येची संपूर्ण रंजक कहाणी...

पार्श्वभूमी: वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेकी हल्ला व ओसामाचा शोध

अल कायदाच्या 19 अतिरेक्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. त्यांनी 4 विमानांचे अपहरण करून आत्मघातकी हल्ला केला होता.
अल कायदाच्या 19 अतिरेक्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. त्यांनी 4 विमानांचे अपहरण करून आत्मघातकी हल्ला केला होता.

11 सप्टेंबर 2001 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेवर अतिरेकी हल्ला झाला होता. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांनी विमानाने हल्ला केला. त्यात 3 हजार जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबादारी अल कायदा नामक अतिरेकी संघटनेने घेतली. या हल्ल्याची जगातील सर्वात भयावह अतिरेकी हल्ल्यांमध्ये गणना केली जाते. त्याचा मास्टरमाईंड होता ओसामा बिन लादेन. त्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणा त्याचा डोळ्यात तेल घालून शोध घेऊ लागल्या.

अफगाणच्या जलालाबादपासून 30 मैल अंतरावरील तोरा-बोरा पर्वताच्या गुहा ओसामाचे लपण्याचे ठिकाण असल्याची माहिती मिळाली. अल कायदाला टिपण्यासाठी अमेरिकेने या भागात हवाई हल्ले सुरू केले. अमेरिका बी-52 नामक बॉम्बर्समधून दररोज 20-30 बॉम्ब फेकत होती. सीआयए अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाण सैन्यही लादेनच्या अल-कायदाच्या अतिरेक्यांवर हल्ला करत होते.

पण CIA ला लादेन सापडला नाही. हे हल्ले सुरू असताना लादेन पाकमध्ये गेला. पाकमध्ये रस्त्याने जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. त्यामुळे तो डोंगर भागातून पाकिस्तानात पोहोचला. ग्वांटानामो बेमध्ये बंद असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्याने हे नंतर उघड केले. लादेनने 2003 मध्ये अल जजीरा वृत्तवाहिनीवरही त्याचा तोरा-बोरातील अनुभव ऑडिओ टेपद्वारे शेअर केला होता.

पूर्व अफगाणिस्तानातील पर्वतांत स्थित तोरा-बोरा म्हणजे गुहा व बोगद्यांचे शेकडो मीटर लांबीचे जाळे आहे. ते 1980 साली सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आले होते.
पूर्व अफगाणिस्तानातील पर्वतांत स्थित तोरा-बोरा म्हणजे गुहा व बोगद्यांचे शेकडो मीटर लांबीचे जाळे आहे. ते 1980 साली सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आले होते.

सीआयएने शोध सुरूच ठेवला, पण अमेरिकेला लादेन सापडला नाही. 2005 मध्ये एक महत्त्वाचा क्लू सापडला. तो लादेनचा पोस्टमन होता. अबू अहमद अल-कुवैती असे त्याचे नाव होते. सीआयएला असे आढळले की, कुवैती हा तोच व्यक्ती होता, ज्याचा तोरा-बोराच्या गुहांमध्ये पकडलेल्या अल कायदाच्या इतर अतिरेक्यांनी उल्लेख केला होता. अधिकाऱ्यांनी त्याचा ईमेल व फोन ट्रेस केला असता त्याचे खरे नाव शेख अल अहमद असल्याचे व तो मूळचा पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले.

जुलै 2010 मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने त्या व्यक्तीने वापरलेला सॅटेलाइट फोन पकडला. हा व्यक्ती ऑगस्टमध्ये पेशावरमध्ये दिसला. त्यानंतर सीआयएने त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्याची हालचाल लादेनच्या घराजवळच दिसली. अमेरिकन उपग्रहांनीही त्याची पुष्टी केली. हे उपग्रह वर्षानुवर्षे लादेनच्या त्या घरावर 24 तास नजर ठेवून होते. घराची रचना, उंच भिंती, बाल्कनीतील भिंती आदींमुळे त्यांचा संशय बळावला.

सीआयएने कॅमेरा व टेलिफोटो लेन्सच्या मदतीने त्या घरातील आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यात या घरात इंटरनेट किंवा फोन सुविधा नसल्याचे समजले. या घराचा कचराही बाहेर टाकला जात नव्हता. सर्वकाही आतमध्येच केले जात होते. येथील अनाकलनीय परिस्थितीने लादेन तिथे लपल्याची शक्यता बळावली होती.

तयारी: ठार मारण्याच्या 3 पर्यायांवर विचार

फेब्रुवारी 2011 मध्ये, व्हाईट हाऊसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. सीआयएने पुष्टी केली की, रेकॉर्ड केलेला आवाज लादेनचाच होता. त्यानंतर पुढील कारवाईसाटी 3 पर्याय सादर करण्यात आले.

  • B2 बॉम्ब टाकणाऱ्या विमानांचा हल्ला
  • क्रूझ क्षेपणास्त्राचा थेट हल्ला
  • हेलिकॉप्टरद्वारे अमेरिकन कमांडोंचा हल्ला

पहिल्या 2 प्रस्तावांत जास्त नुकसान होण्याचा धोका होता. तसेच त्यामुळे लादेनची ओळख पटवणे कठीण झाले असते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या संमतीने तिसऱ्या योजनेवर पुढे जाण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर झालेल्या काही बैठकांत मोहिमेसाठी 2 मे 2011 ही तारीख निश्चित करण्यात आली.

कारवाई: अमेरिकन कमांडो थेट ओसामाच्या घरात शिरले

अफगाणिस्तानातून 2 अमेरिकन हेलिकॉप्टर अबोटाबादमधील लादेनच्या घरावर पोहोचले, तेव्हा 1 हेलिकॉप्टर कोसळले. सीआयएचे प्रमुख पॅनेटा यांना या अपघाताची माहिती सीआयएचे अफगाणिस्तानातील स्टेशन प्रमुख अॅडमिरल मॅकक्रॅव्हन यांनी दिली. द न्यूयॉर्करच्या वृत्तानुसार, मॅकक्रॅव्हन म्हणाले, 'सर, आमचे 1 हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यामुळे प्लान-बी वर काम सुरू झाले आहे. आम्ही या स्थितीसाठी तयार होतो. जवानांना त्यांना काय करायचे आहे हे माहित आहे.'

CIA ने अफगाणच्या सीमेवर 2 चिनूक हेलिकॉप्टर तैनात केले होते. प्लॅन हा होता की, एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यांना बोलावण्यात येईल. त्यांनाही माहिती देण्यात आली.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील 4 सैनिक, दुभाषी व कुत्रा कैरो यांना लादेनच्या घराच्या आवारात थांबवण्यात आले. कॅरो हा खास प्रशिक्षित कुत्रा होता, त्याला बाहेरच्या लोकांना घरात प्रवेश न देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मार्कसह उर्वरित 6 जवान घरात शिरले. हेलिकॉप्टर कोसळले नसते, तर हे लोक थेट लादेनच्या छतावर उतरले असते.

येथे लादेन त्याच्याच तुरुंगवजा घराच्या जाळ्यात अडकला होता. सुरक्षेसाठी त्याने घराच्या बाल्कनीबाहेर भिंतही बांधली होती. खोलीतील दरवाजे लोखंडी व खिडक्या कमी होत्या. त्यामुळे बाहेर काय सुरू आहे हे त्याला पाहताही येत नव्हते.

MH-60M ब्लॅक हॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहेत. ते केवळ यूएस आर्मीच्या 160 व्या स्पेशल ऑपरेशन्स एव्हिएशन रेजिमेंटद्वारे (SOAR) उडवले जाते.
MH-60M ब्लॅक हॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहेत. ते केवळ यूएस आर्मीच्या 160 व्या स्पेशल ऑपरेशन्स एव्हिएशन रेजिमेंटद्वारे (SOAR) उडवले जाते.

लष्करी जवानांना लादेनच्या घरात काय आहे याची कल्पना नव्हती. मार्क व त्याची टीम घरात घुसली. त्यांना काही हालचाल निदर्शनास आली. जवानांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पहिल्या मजल्यावरील खोल्यांची झडती घेतली. दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिना लोखंडी दरवाजाने बंद करण्यात आला होता.

अमेरिकन सैनिकांना संशय आला. त्यांनी गेट स्फोटकांनी उडवले. ते वर जाऊ लागले. अचानक त्यांना लादेनचा 23 वर्षीय मुलगा खालिद मान वाकडी करून बाहेर डोकावताना दिसला. 2 सैनिकांनी त्याच्यावर गोळी झाडली . तो पायऱ्यांवरून खाली कोसळला.

त्यानंतर तिसर्‍या मजल्यावर जाण्याचा मार्गही सापडला. तिथेच ओसामा बिन लादेनची खोली होती. तिसऱ्या मजल्यावरच्या शेवटच्या पायरीवर सैनिकांना तो व्यक्ती दिसला, ज्याचा अमेरिका गत अनेक दशकपांसून शोध घेत होती.

पायऱ्यांवर अंधार पसरला होता. पण नाईट ग्लास घातलेल्या जवानांना समोरचा एक दाढीवाला उंच माणूस 10 फूट अंतरावर असणाऱ्या त्याच्या खोलीतून बाहेर डोकावत असल्याचे दिसले. सैनिक त्याच्याकडे धावले. त्याने घाईघाईने दरवाजा बंद केला. पण घाबरल्यामुळे तो कडी लावणे विसरला. कमांडोंनी धाडकन दरवाजा उघडला. खोलीत समोर ओसामा बिन लादेन होता.

अबोटाबादमध्ये बिन लादेनचे घर. छायाचित्र- NYT
अबोटाबादमध्ये बिन लादेनचे घर. छायाचित्र- NYT

खोलीत लादेनच्या 2 बायकाही होत्या. त्यापैकी त्याची 5वी पत्नी अमल अल-फताह ढाल बनून लादेनपुढे उभी राहिली.

लादेनच्या या मोहिमेवर पुस्तक लिहिणारे पीटर बर्गन यांच्या माहितीनुसार, लादेनच्या बेडरुमच्या शेल्फमध्ये अनेक एके-47 व मकारोव्ह मशीन पिस्तूल होते. लादेनला घाबरून बंदूकही उचलता आली नाही. स्वतःपुढे पत्नी उभी राहिली तरी त्याने त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे जवानांनी प्रथम त्यांच्या पत्नीच्या घोट्यावर गोळी झाडली. ती तिथेच पडली.

अबोटाबादमधील ओसामाच्या घराची उपग्रह प्रतिमा.
अबोटाबादमधील ओसामाच्या घराची उपग्रह प्रतिमा.

समोर उभा असलेला ओसामा बिन लादेन निशस्त्र होता. त्यांच्या अंगात सलवार कमीज व डोक्यावर प्रार्थनेवेळी घातली जाणारी गोल टोपी होती. समोर उभ्या असलेल्या जवानाने त्याच्या छातीत 5.56 मिमीची गोळी झाडली. त्यानंतर तो मागच्या दिशेने खाली पडताच जवानाने त्याच्या डोक्यात आणखी एक गोळी झाडली. गोळी त्याच्या डाव्या डोळ्याच्या अगदी वर लागली. त्यानंतर हा सैनिक ओरडला - जेरोनिमो, जेरोनिमो, जेरोनिमो.

राष्ट्राध्यक्ष ओबामा व्हाईट हाऊसमध्ये सीआयए प्रमुखांसोबत ऑपरेशन लाईव्ह पाहत होते.
राष्ट्राध्यक्ष ओबामा व्हाईट हाऊसमध्ये सीआयए प्रमुखांसोबत ऑपरेशन लाईव्ह पाहत होते.

ही मोहीम आखताना काही कोड तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक कोड होता जेरोनिमो. याचा अर्थ लादेन सापडला. व्हाईट हाऊसमध्ये या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सीआयए टीमने हा शब्द ऐकला. तेवढ्यात पुन्हा आवाज आला "Geronimo E.K.I.A." म्हणजे "शत्रू कारवाईत मारला गेला."

क्लायमॅक्स: लादेनची ओळख पटवण्यासाठी कमांडो मृतदेहाशेजारी झोपला

गोळ्या झाडल्यानंतर लादेनचा मृतदेह पायऱ्यांवरून खाली ओढून नेण्यात आला. लादेनचे रक्त पायऱ्यांवर पडत होते. दुसरीकडे, लादेनला ठार करणाऱ्या 4 सैनिकांनी दुसऱ्या मजल्यावर आणखी झडती घेतली. त्यांनी हातातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांत मिळेल त्या वस्तू भरल्या. खोलीतून फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी व संगणक हार्डवेअर गोळा केले. लादेन व्हिडिओ तयार करताना सोन्याच्या धाग्याचा ओव्हरकोट घालत होता. हा कोटही सैनिकांच्या हाती लागला.

आता सर्व गोष्टी मारला गेलेला व्यक्ती लादेनच आहे की अन्य कुणी? येथे येऊन थांबल्या. ओळख पटवणे आवश्यक आहे असे ठरले गेले. तेवढ्यात चिनूक हेलिकॉप्टर आले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 1 डॉक्टरही होता. त्याने लादेनच्या शरीरात सुई टोचली आणि डीएनएसाठी रक्ताचा नमुना घेतला. दोन्ही हेलिकॉप्टर्स डीएनएचे 2 वेगवेगळे नमुने घेऊन घटनास्थळावरून रवाना झाले.

त्यानंतर क्रॅश झालेले ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर नष्ट करणे आवश्यक होते. पायलटने कॉकपिटमधील पॅनेल, रेडिओ व इतर सर्व काही हातोड्याने फोडले. त्यानंतर त्याने एव्हीओनिक्स सिस्टीम इंजिन व रोटर हेडजवळ स्फोटके ठेवली आणि त्याचा स्फोट केला.

सीआयएच्या कारवाईत क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष.
सीआयएच्या कारवाईत क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष.

इकडे लादेनचा मृतदेह हेलिकॉप्टरमध्ये टाकण्यात आला. एका जवानाने फोटो काढून व्हाईट हाऊसला पाठवला. तिथे चेहरा ओळखणाऱ्या तज्ज्ञांनी जुन्या फोटोंच्या मदतीने फोटोची पुष्टी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर सलग 40 मिनिटे वेगाने उडणारे 2 हेलिकॉप्टर अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये उतरली. तेव्हा अमेरिकेत सायंकाळचे 6, तर पाकिस्तानात मध्यरात्रीचे 2 वाजले होते.

साडे 3 तासांच्या या ऑपरेशननंतर मृतदेहाची ओळख पटवणे आवश्यक होते. अफगाणिस्तानातील सीआयएचे सर्वोच्च अधिकारी अॅडमिरल मॅकरेव्हन यांनी लादेनचा मृतदेह पाहिला. लादेन 6 फूट 2 इंच उंच असल्याचे त्यांना माहीत होते. पण त्यांच्याकडे मोजण्यासाठी टेप उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्या शेजारी एका अमेरिकन सैनिकाला झोपवले व तो लादेनच असल्याची पुष्टी केली.

दरम्यान, लादेनच्या छायाचित्राच्या मदतीने त्याची ओळख पटली. त्यानंतर ओबामा यांनी जेव्हा स्क्वॉड्रन कमांडर जेम्स यांची भेट घेतली, तेव्हा ते म्हणाले की, ’गत 10 वर्षांत जी काही तयारी करण्यात आली, हे त्याचेच फळ आहे.’