आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम देशांची मनधरणी:56 देशांपैकी पाकच तालिबानच्या सोबत; तालिबानची आता रशिया, चीन यांच्यावरच सर्व भिस्त

नवी दिल्ली / मुकेश कौशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामच्या नावावर अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणारा तालिबान आता जगात मान्यता मिळवण्यासाठी धडपडत आहे. मुस्लिम देशांची मनधरणी करण्यासाठी तालिबानी नेते दोहा ते दुशांबेपर्यंत प्रयत्नरत आहेत. मात्र, जगातील ५६ मुस्लिम देशांपैकी फक्त पाकिस्तानच तालिबानच्या सोबत आहे. आर्थिक फायद्यासाठी टपलेले रशिया व चीनही तालिबानला मान्यता देण्याबाबत जाहीर बोलत नाहीत. कारण, जगभरासह आपल्या देशातही त्यांना या मुद्द्यावर विरोध सहन करावा लागत आहे. मुस्लिम देशही आपल्याला पाठिंबा देतील हा तालिबानचा अंदाज फाेल ठरला. शेजारी देश असलेल्या ताजिकिस्तान व कझाकिस्ताननेही तालिबानविरुद्ध सीमेवर लष्करी बळ वाढवले आहे.

मुस्लिम देशांना जाणीव आहे की, ही लढाई संसाधनांवर ताबा मिळवण्याची आहे...
पाक कुठपर्यंत तालिबानला साथ देईल?

जगातील मुस्लिमांची ६२% लोकसंख्या इंडोनेशिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व तुर्कीत आहे. फक्त पाकिस्तान देश म्हणून तालिबानसोबत आहे, तर पाकिस्तानच्या जनतेला तालिबानचे धोरण मान्य नाही, ते आगामी काळात कधी मान्यही करू शकत नाहीत.

इस्लामी जगाची भूमिका काय असेल?
आंतरराष्ट्रीय समुदायातील एकही प्रमुख इस्लामिक देश तालिबानसोबत नाही. तर पाकिस्तानप्रमाणेच मलेशिया व इंडोनेशियाला इस्लामिक सत्ता पसंत आहे. मात्र, तालिबानी कट्टरता स्वीकारत नाहीत. असे केल्यास ते आंतरराष्ट्रीय मंचावर एकटे पडतील.

ओआयसीसारख्या इस्लामी संघटनांची भूमिका का?
५६ देशांचे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) मोठी संघटना असली तर त्यांनी राजकीय अस्तित्व गमावले आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर त्यांच्या भूमिकेला महत्त्व नाही. कारण, अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या शक्तीही मुस्लिमच आहेत. पश्चिम आशियातील देश त्यात सामील झाले तरच एखादा दृष्टिकाेन स्पष्ट होईल. मात्र, सद्य:स्थिती पाहता अशी शक्यता दिसत नाही.

आखाती देश काय करतील?
कतारबाबत द्विधा स्थिती आहे. इतर सर्व आखाती देशांनी तालिबानचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत या देशांच्या वेगवेगळ्या संघटनांनी अफगाण सरकारच्या बाजूने वक्तव्ये िदली होती. मात्र आता ते शांत आहेत. तरीही एक गोष्ट स्पष्ट आहे की, यूएई व सौदी अरेबियासारखे प्रमुख आखाती देश अमेरिकेच्या बाजूनेच राहतील, म्हणजे स्वत:ला तालिबानविरोधात दाखवतील.

मुस्लिम समुदाय याकडे कसे बघतो?
हे स्पष्ट करणे सध्या घाईचे ठरेल. मुस्लिम देश आणि मुस्लिम संघटना ‘वेट अँड वॉच’च्या स्थितीत आहेत. कारण, तालिबानच्या वेगवेगळ्या गटांच्या विचारातही मोठा फरक आहे. तालिबानच्या प्रमुख लोकांनी जी घोषणा केली त्याची जशीच्या तशी अंमलबजावणी होईल असे नाही. तालिबानचे कमांडर आपापल्या भागात आपल्या पद्धतीने राज्य करतात.

रशिया-चीनच्या पाठिंब्याचा काय परिणाम होईल?
तालिबानला नक्कीच यामुळे शक्ती मिळेल. मात्र, हे दोन्ही देश त्याला धर्माच्या दृष्टिकोनातून पाठिंबा देत नाहीयेत, तर अफगाणिस्तानात आपले आर्थिक व सामरिक हित बघत आहेत. यामुळे हा धर्माचा नव्हे, तर संसाधनांवर नियंत्रणाचा मुद्दा आहे. यामुळे चीन व रशियाला तालिबानला नाराज करायचे नाही. मात्र, हे दोन्ही देश आपल्या येथे कट्टरतावादाला चिरडून टाकण्यासाठी कोणत्याही थराला जात असतात.

भारतीयांचे एक पथक काबूलहून निघाले, ७२ अफगाण शीख-हिंदूंना तालिबानने रोखले
काबूल/नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाचे विमान शनिवारी ८५ भारतीयांना घेऊन ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे पोहोचले. तेथे लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मात्र, काबूल विमानतळावर आलेल्या ७२ अफगाणी शीख-हिंदूंना विमानात चढण्यापासून तालिबानने राेखले. यात अफगाण संसदेतील दोन अल्पसंख्याक सदस्यही आहेत. वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे विक्रमजितसिंग यांनी सांगितले, हे लोक काबूलच्या गुरुद्वाऱ्यात आहेत. तालिबानच्या नियंत्रणानंतर २८० अफगाण शीख व ४० हिंदूंनी गुरुद्वाऱ्यात आश्रय घेतला आहे.

- काबूलमध्ये भारताचे आणखी एक लष्करी विमान उभे आहे. त्यातून भारतीयांना आणण्याची तयारी आहे. मात्र, उड्डाणाचा दिवस व वेळ अद्याप निश्चित नाही. अफगाणिस्तानात अजूनही ३२० भारतीय अडकले आहेत.

तालिबानी सैनिकांनी १५० भारतीयांची ठाण्यात नेऊन केली कसून चौकशी
काबूल विमानतळावर आलेल्या १५० भारतीयांची तालिबानी सैनिकांनी ठाण्यात नेऊन चौकशी केली. माध्यमांनी यावर अपहरण झाल्याच्या बातम्या दिल्या. परंतु, तालिबानने वृत्त फेटाळले. या सर्वांना मायदेशी आणण्यासासाठी भारताचा सर्वांशी संपर्क झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...