आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनवर दुसऱ्या लाटेचे सावट:इंग्लंडमध्ये अनलॉकच्या महिनाभरानंतर नवे रुग्ण 9 हजारांवर, 25 फेब्रुवारीनंतर एका दिवसातील सर्वाधिक संख्या

लंडन, जकार्ता, ब्राझिलिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉर्नवाल: जी-7 संमेलनानंतर रुग्णांत 10 टक्के वाढ

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. बुधवारी चाेवीस तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ९०५५ आढळून आली. पूर्वीच्या ११५ दिवसांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. या आधी २५ फेब्रुवारी ९९८५ रुग्ण आढळले होते. देश अनलॉक होऊन एक महिना पूर्ण होताच ही संख्या वाढली. ब्रिटनमध्ये १७ पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती. ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. गेल्या महिन्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९० टक्के डेल्टा व्हेरिएंटने बाधित होते.

डेल्टा व्हेरिएंट ६० टक्के जास्त प्राणघातक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या डेल्टा व्हेरिएंटवरील अभ्यासानंतर चिंता वाढली आहे. या विषाणूमुळे ब्रिटनमध्ये केवळ ११ दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट झाली. गुरुवारी यासंबंधीचा अहवाल जाहीर झाला. इम्पेरियल कॉलेज लंडनने हा अहवाल तयार केला आहे. त्या अंतर्गत २० मे ते ७ जूनपर्यंत एक लाख घरांतून स्वॅब चाचणी करण्यात आली. त्यात ०.१५ टक्के लाेकांत हा घातक विषाणू आढळला.

ब्राझील : कोरोनाचे १० व्हेरिएंट समोर, पी.१ स्ट्रेन ८९ टक्के संसर्गामागील कारण
ब्राझीलच्या संशोधकांनी गुरुवारी साआे पावोलो राज्यात कोरोनाचे नवे व्हेरिएंट शोधून काढले. त्यामुळे ब्राझीलमधील मृतांची संख्या वाढत चालली आहे. ब्राझीलच्या जैविक संशोधन केंद्राने यासंबंधीची माहिती दिली आहे. देशातील ८९.९ टक्के बाधेसाठी पी. १ (अॅमेझॉन) कारणीभूत आहे. त्यानंतर स्ट्रेन बी. १.१.७ (यूके व्हेरिएंट) कारणीभूत ठरतो. ४.६ कोटी लोकसंख्येच्या साआे पावोलोमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

कॉर्नवाल: जी-७ संमेलनानंतर रुग्णांत १० टक्के वाढ
इंग्लंडच्या कॉर्नवालमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या तीनदिवसीय जी-७ संमेलनानंतर तेथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. तेथे एका आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत नवे रुग्ण आढळून आले. कॉर्नवालचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हॉटेल्स बंद करावे लागले. त्याशिवाय संमेलनाचा समारोप झाल्यानंतर रुग्ण वाढीची भीतीही वाढली. कारण संमेलनात अनेक नेते विनामास्क सहभागी झाले होते. त्याचबरोबर सुरक्षित अंतरही राखले गेले नाही.

इंडोनेशिया: चीनची लस घेणाऱ्या ३०० डॉक्टरांना बाधा, ९० टक्के रुग्णालये भरली
इंडोनेशियात ३०० हून जास्त डॉक्टरांना महामारी कोविड-१९ ची बाधा झाली. वास्तविक त्यांना कोरोना लस देण्यात आली होती. डझनावर बाधित डॉक्टर रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना चीनची कोरोना लस सिनावॅक देण्यात आली होती. काही डॉक्टरांना ताप आहे. काहींची ऑक्सिजनची पातळी घसरली. इंडोनेशियात डेल्टा व्हेरिएंटमुळे बुधवारी चार महिन्यांनंतर १० हजारांहून जास्त काेरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णालयांत ९० टक्के खाटा भरल्या आहेत.