आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-केम्ब्रिजचे प्रभुत्व संपुष्टात; सखोल संशोधन अन् विद्यार्थ्यांचे समाधान यामुळे 608 वर्षे जुने सेंट अँड्रयूज विद्यापीठ अव्वल

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ कोणते? उत्तर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज असेच मिळेल. पण या दोन्ही विद्यापीठांचे प्रभुत्व प्रथमच संपुष्टात आले आहे. ६०८ वर्षे जुन्या सेंट अँड्रयूज विद्यापीठाने त्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. शुक्रवारी जारी संडे टाइम्सच्या ‘द गुड युनिव्हर्सिटी गाइड’मध्ये (जीयूजी) या विद्यापीठाला लीग टेबलमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. ऑक्सफर्ड दुसऱ्या आणि केम्ब्रिज तिसऱ्या स्थानी आहे. विद्यार्थ्यांचे समाधान करण्यात सातत्य ठेवल्याने सेंट अँड्रयूजला हा मान मिळाला आहे. रँकिंगमध्ये १३५ विद्यापीठांना समाविष्ट करण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत ब्रिटनच्या कुठल्याही रँकिंगने ऑक्सब्रिजशिवाय (ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज) कुठल्याही संस्थेला अव्वल ठरवले नाही. सेंट अँड्रयूज अनेक वर्षांपासूून रँकिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत होते. पण महामारीदरम्यान या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समाधानाचा स्तर सर्वोच्च पातळीवर गेला. त्याशिवाय नॅशनल स्टुडंट सर्व्हेत (एनएसएस) शिकवण्याची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा अनुभव याबाबतीतही ते इतर विद्यापीठांपेक्षा खूप पुढे आहे.

शैक्षणिक संशोधनाबाबत या विद्यापीठाच्या लाइफ इन्स्टिट्यूशनने उत्कृष्ट काम केले आहे. एडिनबर्ग विद्यापीठासोबत फिजिक्स आणि केमिस्ट्रीतील कामामुळे रिसर्च एक्सलन्स फ्रेमवर्कमध्ये त्याला जास्त गुण मिळाले आहेत. वैद्यकीयव्यतिरिक्त दहशतवाद अभ्यास आणि राजकीय हिंसाचार या विषयांतही विद्यापीठाने चांगले काम केले आहे. पदवी पूर्ण होण्याचा दर, उच्च पदवी प्रदान होण्याचे प्रमाण आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा या मुद्द्यांमध्येही सेंट अँड्रयूजला टॉप १० रेटिंग मिळाले आहे. रँकिंगमध्ये त्याचा फायदा झाला. सेंट अँड्रयूजची स्थापना १४१३ मध्ये झाली होती. जीयूजी लीग टेबलमध्ये रँकिंगसाठी निश्चित आठ मानकांपैकी सातमध्ये वाढ झाल्याने हे विद्यापीठ अव्वल स्थानावर पोहोचले आहे.

जगात सर्वात महाग पदवी ब्रिटनची, एक दशकात ३ पट शुल्क वाढ : ओईसीडी
जगात सर्वात महाग विद्यापीठ पदवी ब्रिटनची आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या (ओईसीडी) अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार ब्रिटिश विद्यापीठे इतर देशांच्या तुलनेत अनेक पट शुल्क घेतात. गेल्या एक वर्षात ब्रिटनमध्ये विद्यापीठांचे शुल्क ३ पट वाढले आहे, ते विकसित देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ब्रिटनमध्ये पदवीसाठी सरकारी विद्यापीठांत सरासरी ९.३८ लाख रुपये शुल्क आहे, विदेशी विद्यार्थ्यांसाठी तर ते आणखी जास्त आहे. न्यूझीलंडमध्ये ३.४८ लाख, जपानमध्ये ३.९४ लाख रु. शुल्क आहे, तर अमेरिकेत हार्वर्ड आणि येलसारख्या खासगी विद्यापीठांत शुल्क अनुक्रमे ३९.५५ लाख आणि ४२.५९ लाख रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...