• Home
  • International
  • Pakistan Plane Crash | Karachi Airport News Update | Pakistan International Airlines (PIA) Passenger Plane Accident news and updates

पाकिस्तान / ईदनिमित्त सोडलेल्या विशेष विमानाला भीषण अपघात, भरवस्तीत विमान कोसळले; 91 ठार, ढिगाऱ्यातून 6 जणांना वाचवले

  • जिना विमानतळावर लँडिंग तीन वेळा अपयशी, 15 घरे पाडत कॉलनीच्या गल्लीत पडले विमान

वृत्तसंस्था

May 23,2020 06:59:00 AM IST

कराची. पाकिस्तानातील कराचीत शुक्रवारी भीषण विमान अपघात झाला. यात ९१ प्रवाशांचा मृत्यू झाला. ईदनिमित्त सोडण्यात आलेले हे विशेष विमान विमानतळाजवळ मॉडल कॉलनीत असलेल्या घरांवर कोसळले. यात ८५ प्रवासी आणि १२ क्रू होते. ६ लोक वाचले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. विमानाच्या पायलटने एटीसीशी संपर्क साधून दोन्ही इंजिन फेल झाल्याचे कळवले होते. प्रत्यक्षदर्शीनुसार, ए-३२० एअरबस विमानाने अपघातापूर्वी तीन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला. यात कॉलनीतील काही लोकही ठार झाले अाहेत. ती संख्या अद्याप समोर आलेली नाही. हे विमान चीनकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या भागांत अरुंद गल्ल्यांमुळे मदत व बचावकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत.

विमानाच्या पायलटचे शेवटचे शब्द- मेडे, मेडे, मेडे...म्हणजे जीव धोक्यात आहे

पायलट व एटीसीच्या संवादाचा ऑडिओ जाहीर झाला आहे...

पायलट : इंजिन बिघडले आहे.

नियंत्रण कक्ष : तुम्ही बेली-लँडिंग करू शकाल का? २.०५ वाजता दोन्ही रनवे उपलब्ध आहेत.
पायलट : मेडे...मेडे...मेडे...

पायलटने जिवाच्या आकांताने हा दिलेला संदेश शेवटचा ठरला. कारण, यानंतर काही क्षणात एका मोबाइल टॉवरला धडकून मॉडल कॉलनी भागात कोसळले.

रेडिओवर संकटाची माहिती देण्यासाठी “मेडे’ हा शब्द वापरला जातो. हा शब्द मूळ फ्रेंच शब्द मेडरहून आलेला आहे. फ्रेंच भाषेत या शब्दाचा अर्थ आहे... ‘मला मदत करा...’

बँक ऑफ पंजाबचे अध्यक्ष वाचले

बँक ऑफ पंजाबचे अध्यक्ष जफर मसूद आणि ज्येष्ठ पत्रकार अन्सारी नक्वी या दोघांचा बचावलेल्या प्रवाशांत समावेश आहे. जफर यांना गंभीर दुखापत झालेली नाही.

X