आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नु जिल्ह्यातील एका तुरुंगात टीटीपीच्या 30 अतिरेक्यांनी एका दहशतवादविरोधी केंद्रावर ताबा मिळवला आहे. या ठिकाणी अतिरेक्यांनी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना ओलिस धरले आहे. तसेच एकाची हत्याही केली आहे. या ठिकाणी स्थिती एवढी गंभीर बनली आहे की, 24 तास लोटल्यानंतरही पाक सरकारला आपल्या अधिकाऱ्यांची सुटका करता आली नाही.
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी तालिबानी अर्थात टीटीपीने दहशतवादविरोधी केंद्रावर ताबा मिळवलेले ठिकाणी अफगाणिस्तान सीमेलगत आहे. पोलिसांनी अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी राबवण्यात आलेली विशेष मोहीमही निष्फळ ठरली आहे.
अतिरेक्यांची अफगाणिस्तानात जाण्याची इच्छा
सुरक्षा जवानांनी संपूर्ण छावणीला घेराव घातला आहे. पाक प्रशासनाने चर्चेच्या माध्यमातूनही अधिकाऱ्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. खैबर पख्तुनख्वा सरकारचे प्रवक्ते मुहम्मद अली सैफ यांनी सांगितले की, पोलिस अधिकाऱ्यांच्या सुटकेसाटी अतिरेक्यांनी सरकारपुढे एक अट ठेवली आहे. सरकारने सुरक्षितपणे अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग उपलब्ध करून द्यावा असे ते म्हणालेत.
पोलिसांची शस्त्रे हिसकावून केंद्रावर ताबा
दहशतवादविरोधी केंद्रावरील टीटीपीच्या ताब्याची सुरुवात एका अतिरेक्याच्या चौकशीतून झाली. केंद्रावरील एक अधिकारी टीटीपीच्या अतिरेक्याची चौकशी करत होता. त्यावेली अतिरेक्याने त्याच्या हातातून बंदूक हिसकावून आपल्या सहकारी अतिरेक्यांची सुटका केली. त्यानंतर पाहता पाहता 30 हून अधिक अतिरेक्यांनी संपूर्ण केंद्रावर ताबा मिळवला. तसेच अधिकाऱ्यांना ओलिस ठेवले.
अतिरेक्यांची म्होरक्यांशी चर्चा
सरकारचे प्रवक्ते मुहम्मद अली सैफ यांनी रॉयटर्सला सांगितले की, अतिरेक्यांचे मन वळवण्यासाठी त्यांची अफगाणिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरेक्यांची त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा घडवून आणण्यात आली.
चर्चा निष्फळ ठरली तर केंद्राचा सफाया
अल जजीराच्या वृत्तानुसार, अतिरेक्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास पाकिस्तानी लष्कर संपूर्ण दहशतवादविरोधी केंद्र उडवून देण्याच्या तयारीत आहे. याऊलट अतिरेक्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागण्या पूर्ण न झाल्यास ओलिस ठेवण्यात आलेल्या संपूर्ण अधिकाऱ्यांची हत्या करण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेची प्रतिक्रिया
खैबर पख्तुनख्वामधील सातत्याने बिघडणाऱ्या कायदा सुव्यवस्थेवर अमेरिकेने पाकपुढे मदतीचा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्रिंस यांनी या प्रकरणी अतिरेक्यांना हिंसाचार थांबवून सर्वच कैद्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे.
असा झाला तहरीक ए तालिबानचा उदय
अतिरेक्यांची फॅक्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानात आतापर्यंत अस्तित्वात आलेल्या सर्वच कट्टरपंथी संघटनांपैकी तहरीक ए तालिबान पाकिस्तान सर्वात धोकादायक संघटना म्हणून ओळखली जाते. या संघटनेने मलाला युसुफझईवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ही संघटना मानवतेच्या सर्वच मर्यादा ओलांडत निष्पाप बालकांनाही लक्ष्य करण्यास घाबरत नाही.
अमेरिकेने 2002 मध्ये अफगाणिस्तानवर कारवाई केली. त्यानंतर तेथील शेकडो अतिरेक्यांनी पाकच्या आदिवासी भागांत आश्रय घेतला. सुरुवातीला पाक लष्कराचे सहकार्य मिळणाऱ्या या अतिरेक्यांनी नंतर पाक लष्करावरच हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात स्वात खोऱ्यात मोहीम राबवण्यात आली. परिणामी, आदिवासी भागात अनेक बंडखोर संघटना उदयास आल्या.
त्यानंतर डिसेंबर 2007 मध्ये बेयतुल्लाह महसूद याच्या नेतृत्वात 13 गटांनी एका तहरीक अर्थात मोहीमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच संघटनेचे नाव तहरीक ए तालिबान पाकिस्तान असे ठेवण्यात आले. या संघटनेला टीटीपी म्हणूनही ओळखले जाते. ही अतिरेकी संघटना अफगाणिस्तानच्या तालिबान संघटनेपेक्षा पूर्णतः वेगळी आहे. पण त्यांचा हेतू जवळपास एकसारखाच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.