आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान:अपहरण करून हिंदूला धमकी, पूर्ण कुटुंबाचे धर्मांतर कर; पाकिस्तानच्या सिंध प्रांतात बळजबरी धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ

कराची (नसीर अब्बास)25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ३२ वर्षीय हिंदू युवकाचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर हिंदू समाज भयभीत आहे. कट्टरवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते, असा आरोप आहे. जोपर्यंत संपूर्ण कुटुंब धर्मांतर करत नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यांची कशीतरी समजूत घालून तेथून सुटका करून घेण्यास युवकाला यश आले. तो थेट ठाण्यात गेला, पण पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. आता प्रकरण न्यायालयात गेले आहे.

ही घटना तंदो अल्लायार जिल्ह्याची आहे. चंदोर किट्ची ऊर्फ चंदू नावाच्या युवकाचे त्याचा शेजारी आझम काश्मिरीने गेल्या आठवड्यात अपहरण केले होते. त्यानंतर त्याचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. सिंधमधील गरीब हिंदूंना मदत करणाऱ्या पाकिस्तान ड्रॉअर असोसिएशन नावाच्या एका संस्थेने हे प्रकरण उपस्थित केले आहे. संस्थेचे अध्यक्ष फकीर शिवा यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, चंदूचे मोबाइलचे दुकान आहे. जवळच आझम काश्मिरीचे दुकान आहे. चंदू तेथे नेहमी जात होता. आझम त्याला बदीन शहरातील एका मौलानाकडे घेऊन गेला. तेथे चंदूचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर आझमने तिघांच्या मदतीने चंदूचे अपहरण केले. आता पत्नी-मुलांना बोलावून धर्म बदल, असे त्याला सांगण्यात आले. चंदूला ते मान्य नव्हते. अखेर चंदूने तेथून पळ काढला आणि थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने चंदूचे वडील आबो किट्ची यांनी काही संस्थांकडे मदत मागितली. नंतर आबो यांनी हे प्रकरण स्थानिक कोर्टात नेले. तेथे पुढील मंगळवारी सुनावणी होईल. आबो यांनी सरन्यायाधीश आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे. आम्हाला दररोज आझम आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून धमक्या मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले.

चंदूने ‘भास्कर’ ला सांगितले की, आझमने अपहरण केले, नंतर चहात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि मौलानाकडे नेले. तेथे कलमा पढण्यासाठी दबाव टाकला. दुसरीकडे, आरोपी आझम काश्मिरीने ‘भास्कर’ला सांगितले की, चंदू बराच काळ माझ्या दुकानावर असायचा. आम्ही धर्मावर चर्चा करत होतो. मला स्वत:ला इस्लामची जास्त माहिती नाही. जी होती, ती त्याला सांगितली. चंदूला आणखी माहिती हवी होती. त्यामुळे आम्ही दोघे मौलानाकडे गेलो. चंदूला मुस्लिम व्हायचे होते, कोणीही बळजबरी केली नाही. मी कोर्टात जाण्यास तयार आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफचे हिंदू खासदार लालचंद माळी म्हणाले की, या घटनेमागे काही धर्मांध लोक आहेत. मी स्वत: चंदूच्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. चंदूच्या कुटुंबाला सुरक्षा दिली जाईल.

पीडित चंदोर किट्ची ऊर्फ चंदूचे तंदो अल्लायार जिल्ह्यात मोबाइलचे दुकान आहे. त्याने त्याच्या शेजाऱ्यावरच अपहरणाचा आरोप केला आहे. प्रकरण कोर्टात गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...