आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:वर्चस्वाचा तालिबानी दावा पंजशीरच्या गटाने फेटाळला, पंजशीर मिळवल्याच्या उन्मादात गोळीबार, १७ जणांनी प्राण गमावले

काबूल19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलन करणाऱ्या महिलांवर प्राणघातक हल्ला

अफगाणिस्तानात पंजशीर प्रदेशावरून संघर्ष सुरू आहे. मात्र शुक्रवारी तालिबानने पंजशीर आता आमच्या ताब्यात असल्याचा दावा केला. संघटनेच्या तीन सूत्रांच्या म्हणण्यानुसार इस्लामिक मिलिशियाने शुक्रवारी काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर खोरे ताब्यात घेतले आहे. याबराेबरच अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी अखेरचा गडही कोसळला. वर्चस्वाचे वृत्त आल्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी जल्लोषात गोळीबार केला. त्यात १७ जणांना प्राण मुकावे लागले. काबूलच्या एका रुग्णालयाच्या हवाल्याने टीव्ही वाहिनीच्या वृत्तानुसार गोळीबारात ४१ लोक जखमीही झाले. तालिबानचा वर्चस्वाचा दावा पंजशीर खोऱ्यातील आंदोलकांनी खोडून काढला आहे. नॉर्दर्न अलायन्सचे नेते अहमद मसूद म्हणाले, पंजशीरवरील विजयाच्या बातम्या पाकिस्तानी मीडियातून झळकू लागल्या आहेत. परंतु त्या असत्य आहेत. पंजशीरवरील त्यांच्या विजयाचा माझा अखेरचा दिवस असेल. गेल्या काही दिवसांतील संघर्षात दोन्ही बाजूच्या ३०० हून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

सालेहकडूनही खंडण
उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहनेदेखील व्हिडिआे जारी करून सोशल मीडियात ते जखमी झाल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. पंजशीरमधून फरार झाल्याचे वृत्तही अफवा असल्याचे सालेह यांनी सांगितले. मी अजूनही पंजशीरमध्ये आहे. परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पंजशीरवरील हल्ल्यादरम्यान तालिबानसोबत पाकिस्तानचे सैनिक असल्याची माहिती मिळाली आहे.

आंदोलन करणाऱ्या महिलांवर प्राणघातक हल्ला
काबूलमध्ये महिला हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर तालिबानने हल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. कार्यकर्ता नर्गिस सद्दात म्हणाल्या, तालिबानी दहशतवाद्यांनी विरोध मोडून काढण्यासाठी बेदम मारहाण केली. त्यात नर्गिस यांच्या चेहऱ्याला इजाही झाली. या महिला तीन दिवसांपासून निदर्शने करत आहेत. नवीन सरकारमध्ये महिलांना भागीदारी मिळावी, अशी आमची मागणी आहे.

दुसऱ्यांदा टाळली सरकार स्थापनेची घोषणा
तालिबानने अफगाणिस्तानात नव्या सरकारची घोषणा शनिवारी टाळली. सरकारची घोषणा टाळण्याची ही दुसरी वेळ आहे. आता सरकार स्थापनेची घोषणा दोन-तीन दिवसांनंतर होऊ शकते. मुल्ला अब्दुल गनी बरादर तालिबान सरकारचा प्रमुख असू शकते, असे वृत्त शुक्रवारी आले होते. सरकारच्या एकूण आराखड्याबाबत अद्याप अंतिम सहमती झाली नसल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...