आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांग्लादेशच्या सिलहट जिल्ह्यात बांग्लादेश नॅश्नलिस्ट पार्टीने (बीएनपी) इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्यात बीएनपीच्या हिंदू नेत्यांना भोजणासाठी गोमांस म्हणजे बीफ वाढण्यात आले. या पार्टीत 20 हून अधिक हिंदू सहभागी झाले होते. एवढेच नाही या पार्टीसाठी आलेल्या हिंदू पत्रकारांनाही गोमांसच वाढण्यात आले. या मुद्यावरुन सोशल मीडियावर वादळ उठले आहे.
बीएनपीने या इफ्तार पार्टीसाठी बीफ वगळता अन्य कोणताही मेन्यू ठेवला नव्हता. अशा प्रकारच्या आयोजनात सामान्यतः मुस्लिम व अन्य समुदायाच्या नागरिकांनाही निमंत्रण असते. पण, ताटात बीफ वाढण्यात आल्याचे पाहून हिंदू कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले. या घटनेची सोशल मीडियात गरमागरम चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर वादंग
या घटनेनंतर बीएनपीच्या विद्यार्थी संघटनेचे नेते कन कांति यांनी सोशल मीडियावर इफ्तार पार्टी एक तमाशा असल्याची टीका केली. ते म्हणाले -तुम्ही इफ्तारीचा आनंद घेतला व आम्ही हिंदू केवळ तुम्हाला पाहत बसलो. तर अन्य एक सदस्य मंटू नाथ म्हणाले -येथे उपस्थित 20 हिंदूंनी मुस्लिम नेते व कार्यकर्त्यांना उपवास सोडताना पहावे लागले.
धर्मनिरपेक्ष राजकारणाला घरघर
बांग्लादेशचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या एकुशी पदकाने सन्मानित अजय दास गुप्ता म्हणाले की, ज्या लष्करी शासकांनी 15 वर्षांपर्यंत बांग्लादेशवर कब्जा केला व राज्य केले, त्यांनी पाक पुरस्कृत जमात ए इस्लामीची एक पक्ष म्हणून स्थापना केली. त्यांनी घटनात्मक दुरुस्तीही केली. यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे राजकारण खिळखिळे होऊन अखेर इस्लाम हा बांग्लादेशाचा राजधर्म घोषित करण्यात आला.
ते म्हणाले -बीएनपी व जमात ए इस्लामी सारख्या काही पक्षांनी कट्टरपंथी इस्लामच्या पाकिस्तानी लष्करी-कट्टरपंथी मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना आपल्या मोहिमेत यश मिळाले नाही.
बीएनपीच्या काळात हिंदूंवरील हल्ले वाढले
यासंबंधीच्या वृत्तानुसार, बीएनपीच्या 2001-2006 या कार्यकाळात हिंदूंवरील हल्ल्यांत वाढ झाली. तेव्हा अनेक हिंदूंच्या शेतजमिनी बळकावण्यात आल्या, मंदिरांवर हल्ले करण्यात आले व महिलांवर बलात्कार करण्यात आले. युद्ध गुन्ह्यांच्या तपासात बीएनपीवर हिंदूंवर हल्ले करण्यासाठी जमातची मदत करण्याचाही आरोप झाला. दरम्यान, गतवर्षी दुर्गा पुजेवेळी झालेल्या हिंसाचाराचाही बीएनपी व जमातच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.