आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोखीम:चार आशियाई देशांत सूट देताच रुग्ण वाढू लागले; आता पुन्हा कठोर प्रतिबंध

सेऊल/मनिला/कोलंबो/जकार्ताएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • फिलिपाइन्स : वुहानपेक्षाही मोठे लॉकडाऊन, मात्र सूट मिळताच सर्व प्रयत्न व्यर्थ

दक्षिण कोरिया असा आशियाई देश आहे, ज्याने सुरुवातीपासूनच कोरोनावर नियंत्रण ठेवले होते. कारण चीननंतर कोरोना येथेच पोहोचला होता. जवळपास ५ कोटी लोकसंख्येचा या देशाने या विषाणूशी लढण्यासाठी लहानातल्या लहान गोष्टीला महत्त्व दिले. शाळा बंद केल्या, लोकांना घरूनच काम करायला सांगितले. मात्र, कधीच पूर्णपणे लॉकडाऊन लागू केले नाही. दक्षिण काेरियात मार्चच्या अखेरीस रोज २० जणांची तपासणी होत होती. त्या वेळी हा आकडा जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त होता. २० मे रोजी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र गुरुवारी देशात ७९ रुग्ण आढळले. त्यानंतर राजधानी सेऊल आणि आसपासच्या परिसरातील शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. देशाचे शिक्षणमंत्री जोंग यून- किन यांनी सांगितले की, देशात पुन्हा फिजिकल डिस्टन्सिंग लागू करण्याची गरज भासू शकते, कारण वाढत्या व्यवहारांमुळे संसर्गाची माहिती मिळवण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचण आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, संसर्गाच्या नव्या प्रकरणाचा शोध घेणे अवघड आहे आणि फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर उपाय करण्याची गरज आहे. कोरिया रोग नियंत्रण केंद्राने म्हटले आहे की, नव्या ७९ रुग्णांपैकी ६७ सोल महानगर क्षेत्रातील आहेत. देशातील अर्धे लोक येथेच राहतात.

इंडोनेशिया : मेमध्ये दुप्पट झाले रुग्ण, दुर्गम भागात पोहोचला संसर्ग

जगातील चौथ्या लोकसंख्येच्या देशात मार्चच्या अखेरच्या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली. मात्र कठोर लॉकडाऊन नव्हते, मेच्या सुरुवातीपर्यंत इंडोनेशियाने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते, मात्र मे महिना संपता संपता दुर्गम बेट मालुकूपर्यंत कोरोना पाेहोचला. येथील लोकांची ये-जा जावा आणि बालीसारख्या भागातही आहे. यामुळे तेथेही धोका वाढला आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात १२ हजार बाधित होते, जे गुरुवारी वाढून २४५३८ झाले.

कुवेतहून परतलेले २५० बाधित, रविवारपासून देशभरात पुन्हा सक्ती

श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या चाचण्या, चांगली आरोग्यसेवा व आधीपासून असलेल्या देखरेख यंत्रणेमुळे कमी मृत्यू झाले. स्थिती चांगली राहिल्याने ५२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर ११ मे रोजी बाजार उघडण्यात आले. गेल्या एक आठवड्यात फक्त दोन दिवस बाधितांची संख्या तीन आकडी राहिली. मात्र, कुवेतहून परतलेले २५० जण पॉझिटिव्ह आढळल्याने सरकार सजग झाले. रविवारपासून लॉकडाऊनचे काही नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फिलिपाइन्स : वुहानपेक्षाही मोठे लॉकडाऊन, मात्र सूट मिळताच सर्व प्रयत्न व्यर्थ

देशात गेल्या २४ तासांत ५३९ रुग्ण आढळले आहेत, तर याआधीच्या आठवड्यात रोज सरासरी ३०० रुग्ण आढळत होते. जानेवारीत कोरोनाचे पहिले प्रकरण आल्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात एवढे कडक वातावरण होते की, राष्ट्रपती दुतेर्ते यांनी सांगितले होते, एखाद्याने लॉकडाऊन तोडल्यास त्याला गोळी घाला. १६ मार्चपासून प्रतिबंध होते. ११ मे रोजी मनिला विमानतळ आणि १६ मे रोजी मेट्रो व काही मॉल उघडण्यात आले. शुक्रवारपासून अंतर्गत उड्डाणे सुरू करण्यात आली. यामुळे देशभरात रुग्ण वाढू लागले.

बातम्या आणखी आहेत...