आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफांची सत्ता अवघ्या 17 तासांत उलथवणारा लश्करशहा:जाणून घ्या पाकचे माजी राष्ट्रपती जनरल मुशर्रफ यांचा थरारक प्रवास

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकचे माजी लश्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांचे रविवारी प्रदिर्घ आजाराने दुबईत निधन झाले. पाकिस्तानी माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. 79 वर्षीय जनरल मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकवर राज्य केले. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी झाला. त्यांनी पाकचे राष्ट्रपती व लष्करप्रमुख या दोन्ही पदांवर का केले. पण आयुष्याचा अखेरचा काळ त्यांना विजनवासात काढावा लागला.

चला तर मग जाणून घेऊया 'रावाचा रंक' बनलेल्या पाकिस्तानच्या माजी लश्करशहाच्या जीवनाची अंगावर शहारे आणणारी थरारक कहाणी...

नवाझ शरीफ यांनी केली होती लष्करप्रमुखपदी नियुक्ती

पाकमधील 1997 च्या सार्वत्रिक निवडणुकांत नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचा विजय झाला. पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर शरीफ यांनी सर्वप्रथम जनरल परवेज मुशर्रफ यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली. येथूनच हळू हळू मुशर्रफ यांची ताकद वाढत गेली. त्यांचा सरकारमधील दबदबा वाढला.

अवघ्या 17 तासांत मुशर्रफांनी केला होता शरीफ यांचा तख्तापालट

पाक माध्यमांच्या वृत्तानुसार, जनरल मुशर्रफ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना शरीफ व इंटेलिजन्स चीफ जनरल झियाउद्दीन यांची इस्लामाबादमध्ये गुप्त बैठक झाली. त्यात मुशर्रफ यांना पदावरून हटवण्याचा कट आखण्यात आला. मुशर्रफ यांना याचा सुगावा लागला. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांनी ताबडतोब कोलंबो विमानतळावरून कराचीच्या दिशेने उड्डाण केले.

दुसरीकडे, जनरल मुशर्रफ यांचे निष्ठावंत लष्करी अधिकारी व सैनिक रावळपिंडीलगत गोळा होऊ लागले. परदेशी पत्रकारांच्या उपस्थितीत पाकिस्तानी लष्कराने सरकारी टीव्ही स्टेशनवर कब्जा केला. शरीफ यांनी त्याच दिवशी दुपारी लष्करप्रमुखपदी नव्या लष्करी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. पण सुरुवातीपासूनच शरीफ यांच्या योजनेनुसार काहीच घडत नव्हते. जवळपास सर्वच उच्चपदस्थ अधिकारी त्यांचे आदेश मानण्यास नकार देत होते.

लष्कराची इस्लामाबादच्या दिशेने धाव

शरीफ यांना मुशर्रफ यांच्या हेतूवर संशय येताच त्यांनी ते पाकमध्ये परत येणारच नाही याची व्यवस्था केली. पंतप्रधान कार्यालयाने मुशर्रफ यांच्या निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेमुळे पाक लष्कराला सरकारविरोधात बंडखोरी करण्याची संधी मिळाली. तासाभरातच लष्कराच्या 111 व्या ब्रिगेडची 10 वी कॉर्प्स इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाली.

लष्कराने शरीफ यांच्या घराला घेराव घातला. त्यांच्या सुरक्षेत तैनात जवानांचे शस्त्र हिसकावून घेतले. शरीफ यांनी नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती करण्याचा आदेश रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानातून विमानतळालगतच्या एका गेस्ट हाऊसवर नेण्यात आले. तोपर्यंत पाक सैनिकांनी महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींवर नियंत्रण मिळवले होते. शरीफ व त्यांच्या निष्ठावंतांच्या मुसक्या आवळल्या होत्या. इथपर्यंत जनरल मुशर्रफ अजून हवेतच म्हणजे विमानातच होते.

विमानाला लँडिंगची परवानगी नाकारली

जनरल मुशर्रफ यांचे विमान सायंकाळी 6.30 च्या सुमारास कराची विमानतळाजवळ पोहोचले. पण ट्रॅफिक कंट्रोलरने त्यांच्या विमानाला लँडिंगची परवानगी दिली नाही. त्या विमानात मुशर्रफ यांच्यासह तब्बल 200 प्रवाशी होते. मुशर्रफ यांना संभाव्य धोका लक्षात आला. त्यानंतर त्यांनी स्वतः ट्रॅफिक कंट्रोलरशी संवाद साधून राइट टू लँडिंगची मागणी केली.

प्रथम कंट्रोलर्सनी लँडिंगची परवानगी देण्यास नकार दिला. पण नंतर सैनिकांनी टॉवरला घेराव घातल्यानंतर विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. मुशर्रफ यांनी नंतर सांगितले की, त्यांच्या विमानात केवळ 7 मिनिटांचे उड्डाण होईल एवढे इंधन उरले होते. रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी सरकारी चॅनेलवर नवाज शरीफ यांच्या तख्तापालटाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जनरल मुशर्रफ यांनी देशाला संबोधित केले.

कारगिल युद्धाचे मास्टरमाइंड

जनरल परवेज मुशर्रफ यांना कारगिल युद्धाचा मास्टरमाइंड मानले जाते. कारगिल युद्धावेळी ते पाकचे लष्करप्रमुख होते. या युद्धाबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही अंधारात ठेवल्याचा आरोप केला जातो.

नवाझसह त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगात डांबले

जनरल मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ व त्यांच्या मंत्र्यांना अटक करुन तुरुंगात डांबले. स्वतःच्या नावाची लष्करप्रमुख म्हणून घोषणा केली. त्यानंतर 2000 साली अमेरिका व सौदी अरेबियाच्या दबावामुळे मुशर्रफ यांनी नवाझ यांना देशाबाहेर जाऊ दिले.

राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रदीर्घ शासन

पाकची सूत्रे हाती घेतल्यानंतर परवेझ मुशर्रफ यांनी स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले. ते 2001 ते 2008 दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. मात्र, त्यानंतर ते पाकच्या सरकारी यंत्रणेचे बळी ठरले.

देशद्रोहाप्रकरणी फाशीची शिक्षा

माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्याकांड व लाल मशीद प्रकरणात जनरल परवेझ मुशर्रफ यांना फरार घोषित करण्यात आले होते. डिसेंबर 2019 मध्ये पाकच्या विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या प्रकरणात दोषी ठरवले. त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 2007 मध्ये आणीबाणी जाहीर केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला होता.

पाकच्या इतिहासात प्रथमच लष्करप्रमुखावर कारवाई

देशद्रोहाच्या आरोपाखाली प्रथमच पाकच्या माजी लष्करप्रमुखांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ होती. पण त्यानंतर 2020 मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा घटनाबाह्य घोषित केली. पण त्यांच्यावरील देशद्रोहाचा ठपका योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना जनरल परवेज मुशर्रफ.
दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना जनरल परवेज मुशर्रफ.

दुबईत जगले निर्वासितांचे जीवन

पाक सरकार आपल्याला तुरुंगात डांबेल अशी भीती मुशर्रफ यांना वाटत होती. त्यामुळे 2016 मध्ये प्रकृतीचा दाखला देत परदेशात गेले. यासाठी तत्कालीन पाक सरकारने त्यांचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमधून काढून टाकले. एवढेच नाही तर त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगीही दिली. तेव्हापासून म्हणजे मार्च 2016 पासून जनरल परवेझ मुशर्रफ दुबईत विजनवासात राहत होते.

बातम्या आणखी आहेत...