आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची बहुप्रतीक्षित भेट भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता झाली. व्हाइट हाऊसमध्ये बायडेन यांनी मोदींचे स्वागत केले. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर झालेली ही पहिली द्विपक्षीय चर्चा होती. मोदी म्हणाले, ‘या दशकात भारत-अमेरिका संबंधांत व्यापाराची भूमिका महत्त्वाची ठरेल. हे दशक कसे आकाराला येईल यात तुमचे नेतृत्व निश्चितपणे महत्त्वाची भूमिका बजावेल. दोन्ही देशांच्या अलौकिक मैत्रीची बीजे पेरली गेली आहेत. हे दशक प्रतिभा व लोकांतील परस्पर संबंधांच्या आधारे आकार घेईल. भारतीय वंशाचे लोक अमेरिकेच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत याबद्दल मला आनंद वाटतो.’बायडेन म्हणाले, ‘दोन्ही देशांचे कौटंुबिक संबंध आहेत. भारतीय वंशाचे सुमारे ४० लाख लोक अमेरिकेला बळकटी देत आहेत. आज आम्ही दोन्ही देशांच्या संबंधांचा नवा अध्याय सुरू केला आहे. मला २०१५ व २०१६ मध्ये तुमच्यासोबत सविस्तर चर्चेची संधी मिळाली होती. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून २००६ मध्ये मी म्हणालो होतो की, २०२०पर्यंत भारत-अमेरिका जगातील सर्वात निकटचे संबंध असलेले देश असतील. दोन्ही देशांतील हे नाते अधिक घट्ट होईल. पंतप्रधान मोदींच्या व्हाइट हाऊस भेटीचा आनंद वाटतो. ’
पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय : कमला हॅरिस
पंतप्रधान मोदींशी गुरुवारी रात्री झालेल्या भेटीत उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी दहशतवादात पाकिस्तानच्या भूमिकेची स्वत: दखल घेतली. त्या म्हणाल्या,‘तेथे अनेक दहशतवादी संघटना आहेत. अमेरिका व भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ नये यासाठी पाकने त्यांच्यावर कारवाई करावी.’ भारत अनेक दशकांपासून दहशतवादामुळे पीडित आहे हेही त्यांनी मान्य केले. त्या म्हणाल्या, ‘लोकशाहीचे संरक्षण ही भारत-अमेरिकेची जबाबदारी आहे.’
माझे भारताशी नाते, भारतात बायडेन आडनावाचे पाच लोक : जो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारतासोबतच्या नात्यावर विनोद केला. ते म्हणाले,‘जेव्हा माझी १९७२ मध्ये सिनेटरपदी निवड झाली, तेव्हा बायडेन आडनावाच्या व्यक्तीने मुंबईहून पत्र पाठवले होते. जेव्हा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून २०१३ मध्ये मुंबईला गेलो होतो तेव्हा मला भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा मी ही घटना सांगितली होती. दुसऱ्या दिवशी माध्यमांनी सांगितले की, भारतात बायडेन आडनावाचे पाच लोक राहतात.’
चर्चेत गांधीजींचा उल्लेख; मोदी म्हणाले, आगामी काळात विश्वस्तता महत्त्वाची
चर्चेदरम्यान बायडेन यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीचा उल्लेख केला. त्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, पुढील आठवड्यात आपण जेव्हा गांधी जयंती साजरी करू तेव्हा आपण लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी घालून दिलेल्या अहिंसा, सहिष्णुता आणि आदर आदी मूल्यांची जगाला आता आधीपेक्षाही जास्त गरज असेल. गांधीजींनी विश्वस्ततेबाबत विचार मांडले होते. ही एक संकल्पना आहे. ती आगामी काळात आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल.
बायडेन म्हणाले : भारत-अमेरिका दोन्ही देश कुटुंबासारखे
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, कोविड-१९, हवामान बदलांच्या आव्हानांशी लढण्यासाठी आणखी मजबुतीने काम करावे लागणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अमेरिकेकडील खूप साऱ्या गोष्टींची भारताला गरज आहे. असेच भारतासोबतही आहे.
- क्वाड संमेलनानंतर पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला रवाना होतील. तेथे ते संयुक्त राष्ट्र आमसभेला संबोधित करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.