आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Preference For Living Outside The City, Declining Urban Revenues, Resulting In Swelling Of The Rural Population

अमेरिकींचा शहरांकडून अपेक्षाभंग:शहराबाहेर वास्तव्याला प्राधान्य, शहरांचा महसूल घटतोय, परिणामी ग्रामीण लोकसंख्येत फुगवटा

वॉशिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिकतेची आेळख बनलेल्या मोठ्या शहरांकडून अमेरिकन लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अमेरिकेत शहर श्रेष्ठत्वाचा टप्पा आता संपला आहे. मध्यमवर्गीय अमेरिकींना आता मेट्रो शहरांत राहण्याची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते शहराच्या बाहेरील परिसरात आणि छोट्या गावांत वास्तव्य करू लागले आहेत. त्यांनी मोठी शहरे कायमची सोडली आहेत. १९९० नंतर पहिल्यांदाच १० लाखांहून जास्त लोकसंख्येच्या अमेरिकेच्या ५६ मोठ्या शहरांच्या लोकसंख्येत घट होत आहे. या शहरांत रिअल इस्टेट उद्योगही तोट्यात आहे. घरांची किंमतही कमी होत आहे. कार्यालयाच्या जागा तर कोरोनानंतर रिकाम्या पडल्या आहेत. त्यांचा वापर शूटिंग स्पेस म्हणून केला जात आहे. मेट्रो शहरांतील अनेक रिअल इस्टेट प्रकल्प रोखण्यात आले आहेत. हजारो फ्लॅट रिकामे पडले आहेत.

खरे तर जगाचे अर्थशास्त्रच बदलू लागले आहे. काही काेरोना तर काही तंत्रज्ञानामुळे बदलले. आता आर्थिक घडामोडी शहर केंद्रित नाहीत. कंपन्या छोट्या शहरांतून व्यवसाय करू लागल्या आहेत. वर्क फ्रॉम होम मॉडेल तेथील कार्यशैलीचा भाग बनले आहे. ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूशनचे वरिष्ठ संशोधक विल्यम फ्रे म्हणाले, आयटी, वित्त, रिअल इस्टेट व एंटरटेनमेंट क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने शहरांतून पलायन करू लागले आहेत. हे लोक मोठे करदाते होते. त्यांच्या पलायनामुळे शहराच्या महसुलात घट झाली. न्यूयॉर्क-वॉशिंग्टनसारख्या मोठ्या शहरांना मिळणारा उत्पन्नावरील करही घटला. कार्यालय, हॉटेल करातही खूप घट झाली. महसुलाच्या बाबतीत छोटी गावे किंवा ग्रामीण भाग श्रीमंत होत चालले आहेत. स्थलांतरितांत सर्वाधिक नोकरदार वर्गात सेवा, आरोग्य, हॉस्पिटॅलिटी, फूड क्षेत्रातील लोक आहेत. लोकांचे पलायन वाढल्याने मोठी शहरे आणि छोट्या वस्त्यांच्या लोकसंख्येतही बदल झाला आहे. लॉस एंजलिसच्या लाँग बीज, शिकागोचे नेपरव्हिले व एल्गिन, फिलाडेल्फियाच्या कॅमडन व विल्मिंग्टनमध्ये लोकसंख्या वाढली आहे. अर्थशास्त्रज्ञ निकोलस ब्लूम म्हणाले, पलायनामुळे अमेरिकन शहरांवरील ताण कमी होईल. महागाई घटेल. जीवन सुकर होईल.

अमेरिकाच नव्हे, ब्रिटनसारख्या पूर्व युरोपातील मोठ्या शहरांतूनही पलायन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे अर्थशास्त्रज्ञ निकाेलस ब्लूम म्हणाले, केवळ अमेरिकेतील शहरेच रिकामी होत आहेत असे नव्हे तर युरोपचीदेखील हीच परिस्थिती आहे. स्वीडन, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलँड, नॉर्वेसारख्या पूर्व युरोपातील अनेक देशांत व्यावसायिक लोक मोठी शहरे सोडून स्थलांतर करू लागले आहेत. १९८० ते २०१९ पर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागात राहण्याची इच्छा सर्वाधिक होती. व्यावसायिक व व्यवस्थापक हायब्रिड मोडमध्ये काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...