आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आक्रोशाचे लोण...:वंशभेदाविरोधात सहा अमेरिकी राज्यांत निदर्शने, आंदोलनाचे लोण अनेक शहरांत पोहोचले

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोर्टलँडमध्ये सलग 60 व्या दिवशी आंदोलन सुरू

वंशभेदाविरोधात अमेरिकेच्या ऑरेगॉनमध्ये अनेक आठवड्यांपासून निदर्शने सुरू आहेत. शनिवारी आंदोलन हिंसक झाले. आंदोलनाचे लोण अमेरिकेतील अनेक शहरांत पोहोचले. सिएटलमध्ये मोर्चा काढणाऱ्या लोकांशी पोलिसांची धुमश्चक्री उडाली. येथे निदर्शकांच्या जमावाने पोलिस छावणीला पेटवून दिले. टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसाच्या गोळीने एकाचा मृत्यू झाला. लॉस एंजलिसमध्ये न्यायालयाबाहेर उशिरा रात्रीपर्यंत निदर्शने सुरूच होती. व्हर्जिनियाच्या रिचमंडमध्ये पोलिसांनी केमिकल स्प्रे टाकून गर्दीला रोखले. कोलोराडोच्या ऑरोरामध्ये लोक महामार्गावर उतरले होते. केंटुकीमध्येही असेच चित्र पाहायला मिळाले.

पोर्टलँडमध्ये सलग ६० व्या दिवशी आंदोलन सुरू होते. त्यात काही माजी सैनिकही सहभागी झाले होते. सर्व आंदोलनस्थळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात नाराजी दिसली. ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल एजंट्सची तैनाती केली. या सुरक्षा दलाने सामान्यांना मारहाण व पेपर स्प्रेने मारा केला. त्यातून आंदोलक भडकले आहेत.

सिएटलमध्ये छावणी पेटवली : सुमारे दोन हजारांच्या हिंसक जमावाने किंग काउंटी येथील बालसुधारगृहाच्या केंद्राला पेटवून दिले. त्याच्याजवळ उभ्या वाहनांनादेखील आग लावली. पोलिसांनी शेकडो लोकांना अटक केली.

न्यूयॉर्कमध्ये पोलिसांची कडक कारवाई : सिएटल व पोर्टलँड येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ न्यूयॉर्कमध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांचा पोलिसांसोबत संघर्ष झाला. वंशभेदाच्या विरोधातील आंदोलनात न्यूयॉर्क, आेमाहा, ऑकलंडसारखी शहरे दूर होती. आता तेथेही असंतोष धुमसतोय.