आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील संसदेच्या सभागृहात ब्रिटिश खासदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारतीय संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात. तिथे विरोध दडपला जात आहे.
ब्रिटनमधील विरोधी मजूर पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी संसदेच्या ग्रँड कमिटी रूममध्ये राहुल गांधींसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राहुल यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेचे अनुभवही सांगितले.
राहुल म्हणाले - भारतात विरोधकांना दडपले जात आहे
राहुल यांच्या कार्यक्रमात ते वापरत असलेला मायक्रोफोन सदोष होता. राहुल यांनी त्याच माइकमध्ये बोलणे सुरू ठेवले. ते म्हणाले की, भारतात आमचे माइक खराब नाहीत, ते कार्यरत आहेत, परंतु तुम्ही ते चालू करू शकत नाही. मी भारतीय संसदेत बोलण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकदा माझ्यासोबत असे घडले आहे. राहुल म्हणाले की, भारतात विरोधकांना दडपले जात आहे.
नोटाबंदी आणि जीएसटीवर कोणत्याही चर्चेला परवानगी नाही
कार्यक्रमात राहुल यांनी नोटाबंदीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, नोटाबंदी हा भारतातील एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता, परंतु आम्हाला त्यावर चर्चा करण्याची परवानगी नव्हती. आम्हाला जीएसटीवर चर्चा करण्याची परवानगी नाही. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरही आम्हाला चर्चा करण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत आम्हाला गुदमरल्यासारखे वाटते.
भारतीय लोकशाही कमकुवत झाली तर जग कमकुवत होईल
कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भारतातील लोकशाही ही जागतिक जनहिताची आहे. भारत खूप विशाल आहे, भारतात लोकशाही कमकुवत झाली तर ती जगभरात कमकुवत होते. भारताची लोकशाही अमेरिका आणि युरोपच्या तिप्पट आहे आणि ही लोकशाही मोडून पडल्यास जगभरातील लोकशाहीला मोठा धक्का बसेल.
चॅथम हाऊसमध्ये राहुल म्हणाले- काँग्रेस संपली असे समजणे ही एक निरर्थक कल्पना
सोमवारी संध्याकाळी राहुल चॅथम हाऊसमध्ये एका संवाद सत्रात सहभागी झाले होते. येथे ते म्हणाले की, भाजपला वाटते की भारतात कायमची सत्ता राहील, पण तसे नाही. आणि काँग्रेस संपुष्टात आली आहे, असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाची कल्पना आहे. भाजपच्या 10 वर्षांच्या सत्तेपूर्वी काँग्रेस 10 वर्षे सत्तेत होती. नीट बघितले तर स्वातंत्र्यापासून आजतागायत काँग्रेस पक्षाने दीर्घकाळ देशाची धुरा सांभाळली आहे.
आरएसएस ही एका सीक्रेट सोसायटीसारखी आहे, ज्याने सर्व संस्था काबीज केल्या आहेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राहुल म्हणाले, 'ते एका गुप्त समाजासारखे आहे, जे फॅसिस्ट आहेत. या संस्थेने देशातील जवळपास सर्वच संस्था काबीज केल्या आहेत. भाजप हा या संघटनेचा भाग आहे. निवडणुकीचा वापर करून सत्तेत येणे आणि नंतर लोकशाहीला बगल देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
ते म्हणाले, 'आरएसएसने इतक्या संस्था कशा बळकावल्या हे पाहून मला खूप आश्चर्य वाटत आहे. वृत्तपत्र, न्यायव्यवस्था, संसद, निवडणूक आयोग, सर्व संस्था त्याच्या दबावाखाली आणि धास्तीत आहेत. अशा स्थितीत विरोधकांना काहीही बोलू दिले जात नाही. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा काढली.
राहुल अनिवासी भारतीयांना म्हणाले - भारत हा खुल्या विचारांचा देश होता, आता तो राहिला नाही
राहुल गांधी यांनी रविवारी लंडनमधील होस्लो येथे 1500 परदेशी भारतीयांसमोर भाषण केले. येथे ते म्हणाले की, आपला देश हा अधिक खुल्या विचारांचा देश आहे. असा देश जिथे आपल्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान वाटतो. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आता हे सर्व उद्ध्वस्त झाले आहे. आपण हे मीडियामध्येदेखील पाहू शकता. यानंतरच आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.
राहुल गांधी म्हणाले की, 'मला हे खूप विचित्र वाटते. एक भारतीय नेता केंब्रिजमध्ये आपले मनातले बोलू शकतो. तो हार्वर्डमध्ये बोलू शकतो, परंतु तो भारतीय विद्यापीठात बोलू शकत नाही. सरकार विरोधकांना कोणत्याही विषयावर चर्चा करू देत नाही. हा तो भारत नाही जो आपण पूर्वी ओळखत होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.