आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेत आणीबाणी लागू आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी मंत्रिमंडळासह राजीनामा दिला असला तरी लोक अजूनही रस्त्यावर उतरल्याचे दिसते. राजपक्षे यांना सत्तेवरून हटवा हा एककलमी कार्यक्रम घेऊन लोक आपल्या मागणीवर ठाम आहेत. संघर्ष निर्माण झाला आहे. परंतु राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे अद्यापही राजीनामा देण्यास तयार नाहीत. गोटाबाया यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी देशाची सगळी सूत्रे आता लष्कराकडे सोपवली आहेत. रस्त्यावर उतरलेल्या निदर्शकांवर आता सैन्य दडपशाहीचा वापर करत आहे. गोटाबाया यांचे विश्वासू लष्करप्रमुख शवेंद्र सिल्वांनी स्वत: सूत्रे हाती घेतली आहेत. आणीबाणी लागू झाल्यानंतर कोणालाही अटक करण्याचे अधिकार लष्कराला मिळाले आहेत. त्यातच सुरक्षेच्या कारणास्ताव श्रीलंकन संसदेची बुधवारी होऊ घातलेली बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावरूनही सामान्य नागरिकांमध्ये गोटाबाया यांच्या विरोधात सर्वत्र असंतोष आहे. महिंदा राजपक्षे यांना भारतात आश्रय देण्यात आलेला नाही, असे भारतीय राजदूत कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
धोका : श्रीलंकेतील निदर्शने सुरूच राहिली तर काही दिवसांत लष्कर सत्ता हाती घेण्याची शक्यता
श्रीलंकेतील प्रमुख राजकीय विश्लेषक कुशाल परेरा ‘भास्कर’ला म्हणाले, देशात सरकार नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही. लोक काही दिवसांपासून रस्त्यावर आंदोलन करत आहेत. हेच आणखी काही दिवस राहिल्यास लष्कर देशाची सत्ता आपल्या हाती घेऊ शकते. मंत्रिमंडळाची स्थापना आणि संसदेचे अधिवेशन बोलवण्यात विलंब केल्याने परिस्थिती हाताबाहेर जात आहे. गोटाबाया यांनी लवकर सरकार स्थापन केले नाहीतर देशात लष्करी राजवट येऊ शकते.
तुटवडा : दूध, गॅस भोजनाची भ्रांत
परदेशी कर्जाच्या डोंगराखालील श्रीलंकेकडे परकीय गंगाजळी संपली आहे. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. सरकार दूध, गॅस, आैषधी इत्यादी आयात करण्यास सक्षम राहिलेले नाही. लोकांकडे पैसा राहिलेला नाही. दुकानेही रिकामी आहेत. विजेचे संकट असल्याने दररोज ५ ते १० तास वीज खंडित होते.
संताप : राजपक्षेंचा गद्दाफींसारखा शेवट ?
महिंदा राजपक्षे व त्यांच्या परिवाराला मोठ्या सुरक्षेत त्रिंकोमालीमध्ये भारतीय ऑइल टँक फॅॅसिलिटीजवळ ठेवण्यात आले आहे. लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. हा संताप पाहिल्यास राजपक्षे यांच्यावर लिबियन हुकूमशहा गद्दाफी यांच्यासारखी वेळ येऊ शकते. त्यामुळेच त्यांना प्रचंड सुरक्षा दिली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.