आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Repentance To Bill Gates Friendship With Epstein Is The Biggest Mistake Of Life, Separation From Melinda Is A Never Ending Sorrow; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:बिल गेट्स यांना पश्चात्ताप - अॅपस्टीनसोबत मैत्री ठेवणे आयुष्यातील सर्वात मोठी चूक, मेलिंडांपासून वेगळे होणे हे कधीही न संपणारे दु:ख

न्यूयॉर्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेट्स म्हणाले - कुटुंबातील स्थिती शक्य तेवढी चांगली करेन, जे होत आहे त्यापासून धडा घेईन

उद्योगपती जेफ्री अॅपस्टीनसोबत वेळ का घालवला, त्याच्याशी मैत्री ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, त्याचा परिणाम पत्नी मेलिंडा यांच्यापासून वेगळे होऊन भोगावा लागत आहे, असा पश्चात्ताप बिल गेट्स यांना झाला आहे. मेलिंडांपासून घटस्फोट हे आयुष्यातील कधीही न संपणारे दु:ख आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. घटस्फोटाला अंतिम रूप दिल्यानंतर दोन दिवसांनी गेट्स यांनी प्रथमच सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या चुका स्वीकारल्या. गेट्स म्हणाले,‘मी अनेकदा अॅपस्टीनसोबत डिनरला गेलो. तो आपल्या संपर्काद्वारे जागतिक आरोग्य व परोपकाराच्या कामासाठी कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकतात, असे मला वाटत होते.

वास्तवात असे काही नाही असे जाणवले तेव्हा हे संबंध तोडले. पण अॅपस्टीनला वेळ देऊन, त्याच्यासोबत राहून त्याच्या विश्वसनीयतेला बळ देणे योग्य नव्हते. त्या परिस्थितीत आणखी लोक होते, पण मी चूक केली. मी अनेकदा अॅपस्टीनला मदत केली होती.’ अब्जाधीश हेज फंड मॅनेजर अॅपस्टीनची अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प, बिल क्लिंटन आणि ब्रिटिश युवराज अँड्ऱ्यू यांसारख्या लोकांशी मैत्री होती. अॅपस्टीनवर मुलींची तस्करी आणि अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे आरोप होते. २००९ मध्ये त्याने तुरुंगात आत्महत्या केली होती. कार्यस्थळी दुर्व्यवहाराच्या आरोपांवर गेट्स मुलाखतीत काही बोलले नाहीत, पण ते म्हणाले, ‘प्रत्येकाला पश्चात्ताप होतो. आता येथून मला पुढे जायचे आहे.

कुटुंबाच्या आत शक्य असेल तेवढी स्थिती चांगली करेन आणि त्यापासून धडा घेईन. मेलिंडा खूप भक्कम आहेत. गेट्स फाउंडेशन चांगले बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आम्ही अजूनही त्यावर चर्चा करतो. ही भागीदारी कायम राहावी, असा प्रयत्न आहे.’ गेट्स यांनी आपल्या लग्नाबाबत अॅपस्टीनशी अनेकदा चर्चा केली होती, अॅपस्टीननेच त्यांना घटस्फोटाचा सल्ला दिला होता, असा दावा करणाऱ्या वाॅल स्ट्रीटच्या वृत्तावर मात्र बिल गेट्स यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

अॅपस्टीनशी मैत्री आणि गेट्स यांच्या वाईट सवयींमुळे खूप नाराज होत्या मेलिंडा
मुलाखतीत गेट्स यांनी मान्य केले की, अॅपस्टीनसोबतच्या मैत्रीमुळे मेलिंडा खूप नाराज होत्या. त्यांनी आपल्या मित्रांशी अनेकदा याबाबत चर्चाही केली होती. मेलिंडांनी कार्यस्थळी दुर्व्यवहाराचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता. गेट्स महिला कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत होते, अशी माहिती मेलिंडांना माध्यमांतील वृत्तांवरून कळत होती. गेट्स यांचे मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते, असे या वर्षी मेमध्ये त्यांना कळाले. त्यानंतर त्यांचा धीर सुटला. २०१९ मध्ये जेव्हा या स‌र्व गोष्टी सार्वजनिक होऊ लागल्या तेव्हा मेलिंडांनी या नात्यातून वेगळे होण्याबाबतचा विचार सुरू केला होता.