• Home
  • International
  • Researchers claim that closing the red light area could reduce Covid 19 cases by 72% in 45 days.

कोरोना संकट / संशोधकांचा दावा- रेड लाइट एरिया बंद ठेवल्‍यास 45 दिवसांमध्‍ये कोविड-19 च्‍या केसेसमध्‍ये 72 टक्‍क्‍यांनी घट होऊ शकते

  • येल स्‍कूल ऑफ मेडिसीन आणि हार्वर्ड मेडिकल स्‍कूलमधील शिक्षणतज्ञांचा अहवाल
  • 60 दिवसांमध्‍ये कोविड-19 मुळे होणा-या मृत्‍यूंचे प्रमाण 28 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते

दिव्य मराठी

May 19,2020 01:46:00 PM IST

वॉशिंग्‍टन. येल स्‍कूल ऑफ मेडिसीन आणि हार्वर्ड मेडिकल स्‍कूलमधील शिक्षणतज्ञांनी 'मॉडेलिंग दि इफेक्‍ट ऑफ कन्टिन्‍यू क्‍लोजर ऑफ रेड-लाइट एरियाज ऑन कोविड-19 ट्रान्‍समिशन इन इंडिया' या विषयावर आधारित संशोधन पूर्ण केले आहे. हे संशोधन निदर्शनास आणते की, कोविड-19 साठी प्रभावी उपचार किंवा लस विकसित करेपर्यंत लॉकडाऊननंतर रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास भारतीयांना कोविड-19 ची लागण होण्‍याचा धोका खूपच कमी आहे. हा हस्‍तक्षेप भारत सरकारला नागरिकांना कोविड-19ची लागण होण्‍याचा धोका कमी करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो.

येल स्‍कूल ऑफ मेडिसीनद्वारे करण्‍यात आलेल्‍या संशोधनाचे निष्‍कर्ष भारत सरकार व विविध राज्‍य सरकारांना सांगण्‍यात आले आहेत. तसेच इन्स्टिट्यूटने त्‍यांना देशामध्‍ये लॉकडाऊन शिथील केल्‍यानंतर देखील रेड-लाइट क्षेत्रे (आरएलए) बंद ठेवण्‍याचा सल्‍ला दिला आहे. यामुळे 45 दिवसांच्‍या कालावधीमध्‍ये केसेस 72 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकतात आणि कोविड-19 केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये 17 दिवसांचे अंतर निर्माण होऊ शकते.

भारत लॉकडाऊन 4.0 च्‍या दिशेने जात असताना केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये अंतर निर्माण झाल्‍यास सरकारला सार्वजनिक आरोग्‍य व अर्थव्‍यवस्‍थेच्‍या संरक्षणासाठी योग्‍य उपाययोजनांचे नियोजन करण्‍यासाठी अधिक वेळ व संधी मिळेल. संशोधन निदर्शनास आणते की, रेड-लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास लॉकडाऊन संपल्‍यानंतरच्‍या पहिल्‍या 60 दिवसांमध्‍ये मृत्‍यूंचे प्रमाण 63 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकते.

राष्‍ट्रीय एड्स नियंत्रण संस्‍थेच्‍या (एनएसीओ) मते, भारतामध्‍ये जवळपास 6,37,500 लैंगिक कर्मचारी आहेत आणि 5 लाखांहून अधिक ग्राहक दररोज रेड-लाइट ठिकाणांना भेट देतात. संशोधन निदर्शनास आणते की, रेड-लाइट ठिकाणे खुली करण्‍यास सुरूवात केली तर आजार झपाट्याने पसरत जाईल आणि अधिकाधिक लैंगिक कर्मचारी व ग्राहकांना संसर्ग होईल. लैंगिक कृत्‍यादरम्‍यान सोशल डिस्‍टन्सिंग राखणे शक्‍य नसल्‍यामुळे संसर्ग होण्‍याचे प्रमाण उच्‍च असेल. संसर्गित ग्राहकामुळे इतर लाखो नागरिकांना आजार पसरत जाईल. ज्‍यामुळे या रेड लाइट ठिकाणांमुळे संसर्गाचे अधिक हॉटस्‍पॉट निर्माण होऊ शकतात. हे हॉटस्‍पॉट लॉकडाऊन संपल्‍यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आजार पसरवू शकतात. यापासून नागरिकांचे संरक्षण करण्‍यासाठी संशोधन कोविड-19 महामारीदरम्‍यान अनिश्चित काळापर्यंत रेड लाइट ठिकाणे बंद ठेवण्‍याचा सल्‍ला देते.

अहवाल भारतभरातील आणि सध्‍या रेड-झोनमध्‍ये असण्‍यासोबत देशात सर्वाधिक लैंगिक कर्मचारी असलेले व सर्वाधिक रेड-लाइट क्षेत्रे असलेल्‍या पाच भारतीय शहरांमधील रेड-लाइट क्षेत्रांच्‍या परिणामांना दाखवतो. संशोधनानुसार लॉकडाऊन संपल्‍यानंतर रेड-लाइट ठिकाणे बंदे ठेवली तर कोविड-19 केसेस वाढण्‍यामध्‍ये अंतर मुंबईत 12 दिवस, नवी दिल्‍लीमध्‍ये 17 दिवस, पुण्‍यामध्‍ये 29 दिवस, नागपूरमध्‍ये 30 दिवस आणि कोलकातामध्‍ये 36 दिवस असू शकते. तसेच यामुळे कोविड-19च्‍या केसेस 45 दिवसांच्‍या कालावधीत मुंबईमध्‍ये 21 टक्‍क्‍यांनी, पुण्‍यामध्‍ये 27 टक्‍क्‍यांनी, नवी दिल्‍लीमध्‍ये 31 टक्‍क्‍यांनी, नागपूरमध्‍ये 56 टक्‍क्‍यांनी आणि कोलकातामध्‍ये 66 टक्‍क्‍यांनी कमी होऊ शकतात.

अहवाल निदर्शनास आणते की रेड-लाइट क्षेत्रे बंद ठेवल्‍यामुळे मृत्‍यूंचे प्रमाण पहिल्‍या 60 दिवसांमध्‍ये भारतात 63 टक्‍क्‍यांनी, मुंबईत 28 टक्‍क्‍यांनी, नवी दिल्‍लीमध्‍ये 38 टक्‍क्‍यांनी, पुण्‍यामध्‍ये 43 टक्‍क्‍यांनी, नागपूरमध्‍ये 61 टक्‍क्‍यांनी आणि कोलकातामध्‍ये 66 टक्‍क्‍यांनी लक्षणीयरित्‍या कमी होऊ शकते. ही आकडेवारी 2.0च्‍या प्रचलित रिप्रॉडक्‍शन नंबरवर (आरओ) आधारित आहे. रिप्रॉडक्‍शन नंबरवर (आरओ) आधारित या आकडेवारीमध्‍ये बदल असू शकतो, जी सतत विविध ठिकाणांमध्‍ये काळासोबत बदलत आहे.

अहवालाबाबत बोलताना सह-लेखक येल स्‍कूल ऑफ मेडिसीन येथील बायोस्‍टॅटिस्टिक्‍सचे प्राध्‍यापक डॉ. जेफरी टाऊनसेंड म्‍हणाले, ''लॉकडाऊन संपल्‍यानंतर रुग्‍णांमध्‍ये वाढ होण्‍याची उच्‍च शक्‍यता आहे. म्‍हणूनच सुधारित दृष्टिकोनाची गरज आहे. वास्‍तविक स्थिती व्‍यक्‍तींच्‍या वर्तणूकीवर अवलंबून असेल आणि आमचे मॉडेल व्‍यक्‍ती कशाप्रकारे वर्तणूक करतील याबाबत अंदाज करत नाही. आमच्‍या मॉडेलिंगचा हेतू भविष्‍यात काय घडेल याबाबत अंदाज करण्‍याचा नाही, तर भविष्‍यातील हस्‍तक्षेपाचे परिणाम जाणून घेण्‍याबाबत आहे. आमच्‍या संशोधनातील निष्‍कर्ष निदर्शनास आणतात की, विशेषत: लॉकडाऊन संपल्‍यानंतर रेड-लाइट ठिकाणे बंद ठेवण्‍याची सर्वाधिक गरज आहे.''

इतर देशांनी देखील अशाच हस्‍तक्षेपांची अंमलबजावणी केली आहे. ऑस्‍ट्रेलियामध्‍ये वेश्‍यागृह व स्ट्रिप क्‍लब्‍स हे व्‍यवसाय देशातील कामकाज पूर्ववत करण्‍याच्‍या योजनेमध्‍ये अनिश्चित कालावधीपर्यंत बंद ठेवण्‍यात आले आहेत. जर्मनी व नेदरलँड्सने देखील नागरिकांचे कोविड-19 पासून संरक्षण करण्‍यासाठी वेश्‍यागृहे बंद ठेवली आहेत. जपानने वेळेत रेड लाइट क्षेत्रे बंद केली नाहीत आणि रेड लाइट क्षेत्रामुळे केसेसच्‍या प्रमाणामध्‍ये ''भडका'' उडाला आणि स्‍थानिक हॉस्पिटल्‍समधील रूग्‍णांची संख्‍या ''मोठ्या प्रमाणात'' वाढली.

भारतातील कोविड-19 स्थितीबाबत बोलताना अहवालाचे सह-लेखक मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील औषध विभाग व हार्वर्ड मेडिकल स्‍कूलचे डॉ. सुधाकर नुती म्‍हणाले, ''भारतीय सरकारने कोविड-19 केसेसचे प्रमाण वाढण्‍याला प्रतिबंध करण्‍यासाठी लवकर केलेल्‍या उपाययोजनांमुळे देशातील संसर्गाचे प्रमाण कमी आहे. रेड लाइट ठिकाणे बंद ठेवल्‍यास सरकारने लॉकडाऊनमध्‍ये प्राप्‍त केलेल्‍या यशाला अधिक फळ मिळेल. भारताने लॉकडाऊनदरम्‍यान आजार वाढण्‍याच्‍या अंतरामध्‍ये जवळपास ४० दिवसांचे यश प्राप्‍त केले आणि रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवल्‍यास यामध्‍ये आणखी 17 दिवसांची भर होऊ शकते. केसेस वाढण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये अंतर निर्माण करण्‍यासाठी करण्‍यात आलेले कोणतेही प्रयत्‍न वैद्यकीय यंत्रणेवरील तणावाचे प्रमाण कमी करते आणि परिणामत: अशा प्रयत्‍नांमुळे लोकांचे जीव वाचण्‍यामध्‍ये मदत होते. रेड लाइट क्षेत्रे पुन्‍हा सुरू केल्‍याने रुग्‍णांमध्‍ये होणा-या संभाव्‍य वाढीला प्रतिबंध केल्‍यास लॉकडाऊनमध्‍ये प्राप्‍त झालेल्‍या यशाचे संरक्षण होईल.''

सल्‍ला देण्‍यात आलेल्‍या हस्‍तक्षेपामुळे भारतभरातील हजारो लैंगिक कर्मचा-यांचे जीवन वाचवण्‍यामध्‍ये देखील मदत होईल. हा हस्‍तक्षेप सरकारला आरएलएमधील लैंगिक कर्मचा-यांचे आरोग्‍य, सुरक्षितता व स्‍वास्‍थ्‍यासंदर्भात साह्य करण्‍यासाठी उपायांचा देखील सल्‍ला देतो, जसे कोविड-19 दरम्‍यान गरीबांसाठी सरकारच्‍या आर्थिक साह्य योजनेचा भाग म्‍हणून मदत व क्षेत्रे बंद ठेवणार असल्‍यामुळे लैंगिक कर्मचा-यांना दुस-या व्‍यवसायामध्‍ये सामावून घेण्‍यासाठी गुंतवणूक.

हे संशोधन केंद्र सरकारला, विशेषत: मोठ्या प्रमाणात लैंगिक कर्मचारी असलेल्‍या भारतीय राज्‍यांना साह्य करण्‍यासाठी करण्‍यात आले आहे. ही राज्‍ये आहेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्‍ट्र, नवी दिल्‍ली, तामिळनाडू, मध्‍यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्‍थान व केरळ. भारतातील कोविड-19चा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेली ही काही राज्‍ये आहेत.

येल युनिव्‍हर्सिटीमधील इकोलॉजी व इव्‍हॉल्‍युशनरी बायोलॉजी विभागाचे प्रा. जेफरी टाऊनसेंड, येल युनिव्‍हर्सिटीमधील सेंटर फॉर इन्‍फेक्शिअस डीसीज मॉडेलिंग अॅण्‍ड अॅनालिसिसचे संचालक प्रा. अलीसन गलवानी आणि मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील औषध विभाग व हार्वर्ड मेडिकल स्‍कूलचे डॉ. सुधाकर नुती यांनी या अहवालाचे सह-लेखन केले आहे.

X