आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रावर मानवी वस्ती उभी करण्यासाठी अहोरात्र संशोधन करणाऱ्या संशोधकांना एक महत्वपूर्ण यश मिळाले आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांनी चंद्रमातीवर रोपटे उगवण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे. ही माती नासाच्या अंतराळपटूंनी काही वर्षांपूर्वी अपोलो मोहिमेद्वारे पृथ्वीवर आणली होती.
चंद्रावर शेती करण्याच्या दिशेने पहिले पाऊल
कम्युनिकेशन बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात वैज्ञानिकांनी सांगितले की, केवळ पृथ्वीच नव्हे तर अंतराळातून आलेल्या मातीवरही वनस्पती उगवू शकते हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. प्रस्तुत अभ्यासात संशोधकांनी चंद्राच्या मातीवरील वनस्पतींच्या जैविक प्रतिसादाचेही निरिक्षण केले. हे चंद्रावर अन्न व ऑक्सिजनसाठी शेती करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले पहिले पाऊल आहे.
असे उगवले रोपटे
फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्राध्यापिका एना-लिसा पॉल यांनी सांगितले की, या प्रयोगाच्या अगोदरही चंद्राच्या मातीवर वनस्पती उगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तेव्हा त्या रोपट्यांवर केवळ चंद्राची माती शिंपडण्यात आली होती. नव्या संशोधनात चंद्राच्या मातीतच रोपटे उगवण्यात आले.
संशोधकांनी यासाठी 4 प्लेट्सचा वापर केला. त्यात पाण्यासह चंद्रमातीवर न आढळणारे न्यूट्रिएंट्स मिसळण्यात आले. त्यानंतर या द्रव्यात ऑर्बिडोप्सिसचे बियाणे पेरण्यात आले. त्यानंतर काही दिवसांतच या मातीतून बीजांकुर बाहेर पडले.
केवळ 12 ग्रॅम मातीचा वापर
नासाच्या अपोलो चांद्र मोहिमेद्वारे 6 अंतराळपटूंनी आपल्यासोबत 382 किलो दगड आणले होते. हे दगड संशोधकांना देण्यात आले होते. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या माहितीनुसार, 11 वर्षांत 3 वेळा अर्ज केल्यानंतर नासाने त्यांना 12 ग्रॅम माती दिली. एवढ्याशा मातीवर प्रयोग करणे अशक्य होते. पण, अखेरिस त्यांना रोपटे उगवण्यात यश आले. ही माती अपोलो 11, 12 व 17 मोहिमेद्वारे गोळा करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.