आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन महिन्यांपासून सुरू असलेला युक्रेनमधील पेच निवळण्याची चिन्हे मंगळवारी दिसून आली. युक्रेनच्या सीमेवर तैनात काही सैनिकांना ट्रक व ट्रेनने त्यांच्या मूळ चौकीवर नेण्यात येत असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनशेंकोव्ह यांनी दिली. तसे असले तरी अद्यापही हल्ल्याची शक्यता संपुष्टात आली नाही. कारण रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ १,३०, ००० हून जास्त सैनिकांची तैनाती केली. प्रवक्ता म्हणाले, बेलारूसमध्ये संयुक्त लष्करी सराव सुरू राहणार आहे. जर्मनीचे चान्सलर आेलाफ शॉल्प्स मॉस्कोच्या दौऱ्यावर दाखल होताच रशियन सैन्य कपातीस सुरुवात झाली. जर्मन चान्सलरने युक्रेन दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियाला भेट दिली.
या प्रकरणात रशियाने मागे हटावे यासाठी पुतीन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न आपण करू, असे आश्वासन ओलाफ यांनी युक्रेन नेतृत्वाला दिले होते. संकट टाळण्यासाठी ब्रिटन, फ्रान्सपासून अमेरिका व ब्राझीलपर्यंत कूटनीतीच्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो मॉस्कोच्या भेटीवर गेले होते. रशियाचा दौरा करू नये, असा सल्ला अमेरिका तसेच तेथील खासदारांनी बोलसोनारो यांना दिला होता. परंतु त्यांनी अमेरिकेच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून रशियाला भेट दिली.
परिणाम : पेचामुळे सौदी अरेबियास लाभ, भारताची हानी
युक्रेन व रशियातील तणावामुळे जगभरात तेलाच्या दरात वाढ झाली. त्याचा फायदा तेल उत्पादक देश घेत आहेत. त्यातही सौदी अरेबियाने तो उचलण्याचा प्रयत्न केला. सौदी आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थिर होण्यासाठी धडपडत आहे. कारण सौदीच्या राजघराण्यासाठी चार वर्षे कठीण गेली. २०१८ मध्ये तुर्कीत वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगीच्या हत्येचा डाग सौदीवर आहे. २०२० मध्ये महामारीमुळे तेलाचे दर पूर्णपणे कोसळले. त्याचा सौदीच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला. आता सौदी अमेरिकेचा कट्टर समर्थक म्हणून वावरू लागला आहे. जागतिक तेल उत्पादनापैकी ५५ टक्के भागावर सौदीचे वर्चस्व आहे. सौदीकडे मोठ्या प्रमाणात तेलाची मागणी असून त्याची पूर्ततादेखील करता येत नाही. वाढती मागणी व दर लक्षात घेऊन ३७५ अब्ज डॉलर (सुमारे २८ लाख कोटी) एवढा महसूल यंदा सौदीला मिळू शकतो.
चिंता : भारतास ८५ टक्के तेल आयात करावे लागते
युक्रेन संकटामुळे भारताचे नुकसान होत आहे. कारण भारताला ८५ टक्क्यांहून जास्त कच्चे तेल आयात करावे लागते. त्याची किंमत भारताला द्यावी लागते. कच्च्या तेलाचे दर वाढणे आणि डॉलर बळकट झाल्यास त्याचा फटका पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून दिसून येतो. म्हणूनच पूर्व युरोपातील घडामोडींचा परिणाम दक्षिण आशियातील अनेक देशांनाही बसू शकतो.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री लिज ट्रस मंगळवारी म्हणाले, युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याची जास्त शक्यता वाटते. हे लवकरच दिसू शकते. परंतु त्यातून युरोपातील स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने युक्रेन दूतावासाचे संचालन लीव्ह शहरातून सुरू केले आहे. राजधानी कीव्हमधून ते हलवण्यात आले. परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्याची घोषणा केली. युक्रेन संकटावर भारतातील राजदूत नाओर गिलोन म्हणाले, आम्ही दूतावासामध्ये आपली राजकीय शक्ती वाढवली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.