आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने युक्रेनवर डागले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र:ताशी 12 हजार किमी वेग असणाऱ्या क्षेपणास्त्राने शस्त्र डेपो उडवला, युद्धात प्रथमच झाला वापर

कीव्ह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत 24 फेब्रुवारीला सुरु झालेले रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरुच आहे. युद्धाच्या 24 व्या दिवशी रशियाने युक्रेनवर 'किन्झॉल' नामक अत्याधूनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्याद्वारे युक्रेनच्या पश्चिम भागातील एक भव्य शस्त्र डेपो (शस्त्रागार) उद्ध्वस्त करण्यात यश आल्याचा दावा रशियाने केला आहे. किन्झॉल हा रशियन शब्द असून, 'खंजीर' असा त्याचा अर्थ होतो. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, हायपरसॉनिक एअरोबॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह किन्झॉल एव्हिएशन क्षेपणास्त्र यंत्रणेने इव्हानो-फ्रँकिव्हस्क भागातील डेलियाटीन गावातील क्षेपणास्त्र व दारुगोळ्याचे एक मोठा अंडरग्राउंड डेपो उद्ध्वस्त केला. रशिया करु शकतो अणुहल्ला दुसरीकडे, अमेरिकेने रशिया युक्रेनवर अणुहल्ला करण्याच्या विचारात असल्याचा इशारा दिला आहे. रशियन लष्करात 2018 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत आण्विक व पारंपरिक शस्त्रे घेवून ताशी 4900 ते 12350 किमी वेगाने शत्रूवर हल्ला करु शकते. पुतीन यांची फ्रान्सच्या अध्यक्षांशी चर्चा या युद्धावर तोडगा काढण्यासाठी डिप्लोमॅटीक मार्गही चाचपडून पाहिले जात आहेत. या अनुषंगाने रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्नीवरुन संवाद साधला. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध गुन्ह्याचाही आरोप केला आहे. 'युक्रेनमधील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी रशियन सैन्य सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यासाठी मानवीय कॉरिडोर तयार करण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे,' असे पुतीन यांनी म्हटले आहे. काय आहेत किन्झॉलची वैशिष्ट्ये? तब्बल 1500 मैल म्हणजे 2000 किमीची मारक क्षमता असणारे किन्झॉल आपल्यासोबत अणुबॉम्बही घेवून जाऊ शकते. त्यामुळे ब्लादिमीर पुतीन या क्षेपणास्त्राचा उल्लेख 'आयडियल वेपन' म्हणून करतात. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2018 मध्ये घेण्यात आली होती. किन्झॉल क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीहून 10 पट जास्त आहे. ते शत्रूवर प्रतिसेकंद 3 किमी या वेगाने हल्ला चढऊ शकते. या प्रचंड वेगामुळे त्याच्यापुढे अत्याधूनिक हवाई सुरक्षा यंत्रणाही अपयशी ठरते. या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रावरील सेंसर्समुळे त्याला जमिनीपासून समुद्रापर्यंत अचूक हल्ला करण्याची अतुलनिय ताकद मिळते.

बातम्या आणखी आहेत...