आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Russia Ukraine Conflict | Marathi News |Russian President Vladimir Putin Authorises Special Military Operation In Ukraine's Donbas, Russia Ukraine Conflict

युद्धाची घोषणा:युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले - हे संपूर्ण युरोपविरुद्धचे युद्ध; युक्रेनचे 54 आणि रशियाचे 50 सैनिक मारले गेल्याचा दावा

मॉस्को6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. आतापर्यंत 54 युक्रेनियन सैनिक आणि 10 नागरिक मारले गेले आहेत. त्याचवेळी, युक्रेनने रशियाचे 50 सैनिक मारले आणि 6 लढाऊ विमाने-टँक नष्ट केल्याचा दावा केला आहे. कीवमध्ये युक्रेनियन लढाऊ विमान कोसळले. 14 जवान शहीद झाल्याचा दुजोरा मिळाला आहे.

कीवमधील भारतीय दूतावास बंद होणार नाही, असे युक्रेनमधील भारतीय राजदूतांनी म्हटले आहे. पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. त्याचवेळी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पावले उचलत आहे. युक्रेनमधील हवाई क्षेत्र बंद आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

येथे, युक्रेनचे राजदूत नवी दिल्लीत मीडियासमोर हजर झाले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची विनंती केली. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांनीही लष्करी आणि आर्थिक हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. EU अध्यक्ष उर्साला म्हणाल्या - रशियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल.

रशियाने फेटाळला युक्रेनचा दावा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा करताच 5 मिनिटांत 13 ठिकाणी हवाई हल्ले झाले. यात युक्रेनने प्रत्युत्तर देऊन रशियाचे 6 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतु, रशिया टुडेच्या वृत्तानुसार रशियाने हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनने रशियाचा एकही विमान पाडलेला नाही असे संरक्षण मंत्रालयाने पत्रकाद्वारे जाहीर केले.

पुतिन यांची घोषणा आणि तत्काळ हल्ला
तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर हल्ल्याची घोषणा केली. रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी ढवळाढवळ केली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील, असे धमकीवजा शब्दात त्यांनी सांगितले. त्याचा इशारा अमेरिका आणि नाटो सैन्याकडे होता.

या विधानानंतर पाच मिनिटांनी युक्रेनची राजधानी कीवसह अनेक प्रांतांमध्ये 12 स्फोट झाले. राजधानी कीववरही क्षेपणास्त्र हल्ला झाला. तेथे विमानतळ बंद करण्यात आले. या कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका मोहीम थांबवावी लागली.

डेंजर झोन अलर्टमुळे युक्रेनला जाणारे एअर इंडियाचे विमान परतले आहे. युक्रेन म्हणाला- आमच्यावर तीन बाजूंनी हल्ला झाला आहे... रशिया, बेलारूस आणि क्रिमिया सीमेवरून. लुहान्स्क, खार्किव, चेरनिव्ह, सुमी आणि जाटोमिर प्रांतात हल्ले सुरूच आहेत.

जगाने रशियाला थांबवण्याची हीच वेळ! -युक्रेन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जगाला आधीच धमकावले आहे की कुणीही युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. यानंतर युक्रेन सरकारने जगाला मदतीचे आवाहन केले. आमच्यावर तिन्ही बाजूंनी रशियाचे हवाई हल्ले सुरू आहेत. तरीही आम्ही झुकणार नाही. प्रत्येक हल्ल्याला उत्तर देऊ. जगाने रशियाला उत्तर देण्याची आणि थांबवण्याची हीच योग्य वेळ आहे. असे युक्रेन सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. या दरम्यान युक्रेनने रशियाचे 6 लढाऊ विमान हाणून पाडले आहेत.

...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील -पुतिन

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. युक्रेनची साथ दिली तर गंभीर परिणाम भोगावे अशा शब्दांत नाटो आणि अमेरिकेला धमकावले आहे. युक्रेन काबिज करण्याचा आमचा हेतू नाही. तसेच नागरिकांना सुद्धा लक्ष्य केले जात नाही. युक्रेनच्या सैनिकांनी माघार घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विधानानंतर लगेचच युक्रेन आणि राजधानी कीवमधील बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार, क्रमाटोस्कमध्ये 2 स्फोट झाले. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये प्रवेश करत आहेत. तर 2 लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात आहेत. पूर्व युक्रेनच्या डोनेत्स्क भागात राहणाऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांनी या भागात स्फोट झाल्याची माहिती दिली.

शांततेचे आवाहन
संयुक्त राष्ट्राकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. फ्रान्सने बुधवारी आपल्या नागरिकांना विलंब न करता युक्रेन सोडण्यास सांगितले. फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य गोळा झाल्यामुळे गंभीर तणाव निर्माण झाला आहे. तसेच, दोन फुटीरतावादी प्रदेशांना रशियाने मान्यता दिली. युक्रेनने आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे युक्रेनमधील फ्रेंच नागरिकांनी विलंब न करता देश सोडायला हवा.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. या बैठकीत रशिया-युक्रेन संकट, इंडो-पॅसिफिकमधील परस्पर सहकार्य, भारत आणि फ्रान्समधील राजकीय, आर्थिक आणि संरक्षण संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. पूर्व युरोपमधील तणाव कमी करण्यासाठी मॅक्रॉनच्या प्रयत्नांचे भारताने कौतुक केले. फ्रेंच इंटरनॅशनल रिलेशन्स संस्थेत बोलताना जयशंकर यांनी फ्रान्सचे कौतुक केले आणि त्याला जागतिक महासत्ता म्हटले.

आणीबाणीची घोषणा

रशियाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या संसदेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. आणीबाणीच्या घोषणेसह, युक्रेनने आपल्या 30 लाख लोकांना त्वरित रशिया सोडण्यास सांगितले आहे. रशियाने बुधवारी युक्रेनच्या बँकांवर आणि संरक्षण, परराष्ट्र, अंतर्गत सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या वेबसाइटवर सायबर हल्ले केले. उपपंतप्रधान फेडोरोव्ह म्हणाले की, रशियाला चोख प्रत्युत्तर देऊ.

बातम्या आणखी आहेत...