आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी युक्रेनची राजधानी कीव्हपासून ९०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलतावा शहरात आहे. इथे असलेल्या पोलतावा वैद्यकीय विद्यापीठात मी वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे. महाराष्ट्रातल्या पनवेलचे आणखी दोघे माझ्याबरोबर याच विद्यापीठात आहेत. रोजप्रमाणे आजही सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठात आम्ही लेक्चर ऐकत होतो आणि अचानक रशियाने हल्ला केल्याची बातमी आली. त्यानंतर आमचे वर्गातले शिक्षण थांबवण्यात आले आणि दुपारनंतर आॅनलाइन लेक्चर सुरू होतील, असे सांगण्यात आले आहे.
आम्ही राजधानी आणि सरहद्दीपासूनही खूप लांब आहोत त्याचा हा फायदा आहे, असे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे आम्हीही तणावात नाही. भारतीय वकिलातीतून ई-मेलद्वारे आम्हा भारतीयांशी संवाद साधला जातो आहे. आज सकाळी संजय राऊत नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला होता. चार्टर्ड फ्लाइटने भारतात पाठवण्याची व्यवस्था करता येईल, असे ते सांगताहेत. एक विमानतळ रशियाने ताब्यात घेतल्याच्याही बातम्या आल्या आहेत. त्यामुळे आमची परतण्याची कशी व्यवस्था करणार त्यांनाच माहिती.
भारतात पालक चिंतेत : आम्ही इकडे सुरक्षित आहोत. असे भारतीय वकिलातीनेही सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. पण आमचे भारतातील पालक आणि नातेवाईक मात्र तणावात आहोत. सारखे फोन करून चिंता व्यक्त करताहेत. मी जळगावला असतो. डिसेंबरमध्येच इथे आलो आहे. त्यानंतर लगेचच आता हा तणाव निर्माण झाला आहे.
शब्दांकन : गणेश सुरसे, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.