आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेन:अन्न, पाणीही 2 दिवस पुरेल इतकेच शिल्लक; मला लवकर बाहेर काढा, जळगावच्या विद्यार्थ्याची सरकारला विनंती

युक्रेन / सौरभ विजय पाटील6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी युक्रेनची राजधानी कीव्ह शहरात अडकलो असून बाहेर अत्यंत भयावह परिस्थिती आहे. सतत बॉम्ब पडण्याचे आवाज येत आहेत. आपल्या इमारतीवर तर पडणार नाही ना ही भीती प्रत्येक क्षणाला मनात आहे. आमचे खाद्यपदार्थदेखील संपत आले असून दोन दिवस पुरेल इतकेच शिल्लक आहे. वसतिगृहात मी एकच भारतीय विद्यार्थी असून मला लवकर येथून सुरक्षित बाहेर काढावे, अशी सरकारला विनंती करत आहे.

मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून राष्ट्रीय क्रीडा व शारीरिक शिक्षण विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कीव्ह येथे मी कोन्स्टानैस्का लेन ७, डेमिविस्का येथील क्रमांक एकच्या वसतिगृहात अडकलो आहे. बाहेर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. २३ तारखेपासून मी वसतिगृहातच आहे. सर्व दुकाने बंद आहेत. रस्त्यावर फक्त सैन्य आहे. दिवसरात्र या ठिकाणी हल्ले सुरू आहेत. बुधवारी पहिल्या दिवशी पहाटे साडेचार वाजता मी गाढ झोपेत असताना अचानक जोरात आवाज झाला. त्यामुळे सर्व विद्यार्थी जागे झाले. तो आवाज इतका भयावह होता की त्याची भीती अजूनही मनातून कमी झालेली नाही. तेव्हापासून दिवसा कमी मात्र रात्री जास्त असे हल्ले सुरूच आहे. किचनमध्ये अत्यंत थोडा गॅस शिल्लक राहिला आहे. तो संपल्यानंतर आम्हाला जेवणही बनवता येणार नाही.

कंट्रोल रूममधून विचारणा
पाणीही संपत आले आहे. अन्न, पाणी पुरावे म्हणून बचत करून ते थोडे-थोडे वापरत आहे. मात्र दोन दिवसांपेक्षा जास्त हे पुरणार नाही. मला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र कंट्रोल रूममधून विचारणा झाली असून सध्याची परिस्थिती पाहता लवकरात लवकर मला मदत करावी. माझी आई चिंतेत आहे. शब्दांकन : धनश्री बागूल

राज्यातील २७ विद्यार्थी सुखरूप परतले
नवी दिल्ली| युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विशेष विमान रविवारी पहाटे साडेतीन वाजता दिल्लीत दाखल झाले. यात महाराष्ट्रातील २७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पोहोचता यावे यासाठी दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सदनाच्या वतीने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या स्थळी पोहोचवण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...