आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रशियन उपग्रहाचा कचरा अंतराळ केंद्राच्या जवळून गेल्याने धोका होता, अंतराळवीरांनी जीव मुठीत घेऊन कॅप्सूल गाठले

मॉस्को | न्यूयॉर्क18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाने अंतराळात उपग्रहाला नष्ट करणाऱ्या अँटी सॅटेलाइट मिसाइलचे (एसॅट) परीक्षण केले. हे परीक्षण करण्यासाठी रशियाने आपल्या एका जुन्या हेरगिरी करणाऱ्या कॉसमॉस-१४०८ या उपग्रहाला उडवले. त्याचा कचरा अंतराळात भ्रमंती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (आयएसएस) अगदी जवळून गेला. त्यामुळे आयएसएसवर काम करणाऱ्या अमेरिकेच्या चार, जर्मनीचे एक व रशियाच्या दोन अंतराळवीरांना परतीच्या सुएझ यानात परतावे लागले.

ही एक आपत्कालीन व्यवस्था आहे. एखादा धोका दिसल्यास अंतराळवीर बचावासाठी त्यात जातात. त्याद्वारे त्यांना पृथ्वीवर परतता येऊ शकते. रशियाने हे परीक्षण नेमके कधी केले हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या परीक्षणाची माहितीही रशियाने संबंधित देशांना दिली नाही. या घटनाक्रमाची निगराणी करणाऱ्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकी ९० मिनिटे किंवा त्यानंतर रशियाच्या उपग्रहाचा ढिगारा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या जवळून गेला. रशियाची अंतराळ संस्था रोसकोसमोसनेदेखील त्याची पुष्टी केली आहे. कक्षेत काही वस्तू आल्याने चालकदलास आपल्या यानात जावे लागले. ही एक नियमित प्रक्रिया आहे. हा ढिगारा आता कक्षेच्या बाहेर गेला आहे. आता अंतराळ स्थानक ग्रीन झोनमध्ये आहे, असे संस्थेने स्पष्ट केले. रशियाची ही कृती धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे. अंतराळातील या ढिगाऱ्यामुळे स्थानकाच्या कामात व्यत्यय आला. या कृतीबद्दल रशियाला योग्य उत्तर दिले जाईल. भारत, अमेरिका, रशिया व चीनसारखे देश पृथ्वीवरूनच उपग्रहांना बाहेर काढण्यास सक्षम आहेत. चीनने २००७ मध्ये हवामानविषयक आपल्या निष्क्रिय उपग्रहाला नष्ट केले होते. त्याचे तीन हजारांहून जास्त तुकडे झाले होते.

बातम्या आणखी आहेत...