आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिनाभरापासून युद्धाचा सराव करत असलेले रशियाचे लष्कर अमेरिका-युरोपच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत युक्रेनच्या दोन प्रांतांत घुसले आहे. दरम्यान, या वेळी झालेल्या संघर्षात युक्रेनचा एक जवान ठार तर सहा जखमी झाल्याचे स्थानिक सरकारने म्हटले आहे. रात्री उशिरा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी रशियावर कठाेर आर्थिक निर्बंध लादण्याची घाेषणा केली. तत्पूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या दोनेत्स्क व लुहान्स्क या २ प्रांतांना स्वतंत्र घोिषत करून शासनादेशावर स्वाक्षरी केली. या दोन्ही प्रांतांत आता रशियन लष्कर कायमचे तैनात राहील. या प्रांतांतील मोठे भाग रशिया समर्थक आहेत.
रशियाची आर्थिक नाकेबंदी!
रशियन लष्कराच्या कारवाईनंतर इकडे अमेरिकी प्रशासन सतर्क झाले असून अध्यक्ष जाे बायडेन यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजता रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची घाेषणा केली. विशेषत: दाेन प्रमुख वित्तीय संस्थांवर ही कारवाई होईल. नाटो आघाडीच्या मदतीसाठी लष्करी रसद पुरवण्याचे संकेतही बायडेन यांनी दिले. निर्बंधांबाबत बुधवारी सविस्तर घोषणा होऊ शकते.
विशेष विमानांनी आणले जाताहेत भारतीय : एअर इंडियाच्या विमानाने मंगळवारी युक्रेनहून २४० लोक आणले. आणखी २ विमाने जातील. युक्रेनमध्ये भारताचे २० हजार विद्यार्थी-नागरिक आहेत.
आर्थिक घाव घातल्यानंतरच वठणीवर येतील पुतीन
‘क्रिमियावर हल्ल्यानंतर २०१४ मध्ये रशियावर मर्यादित आर्थिक निर्बंध लागले. आजवर तेथील जीडीपी वृद्धी ०.३% च्या वर आलेली नाही. या स्थितीत पुतीन यांना रोखण्यासाठी कठोर आर्थिक निर्बंध महत्त्वाचे शस्त्र असेल. पुतीन घरातच घेरले जातील.’ -हर्ष व्ही. पंत, प्रोफेसर, किंग्ज कॉलेज, लंडन
रशियाने १३ वर्षांपूर्वी जे जॉर्जियासोबत केले, आता तेच युक्रेनसोबत करताेय
रशियाने युक्रेनच्या दोनेत्स्क व लुहान्स्क प्रांतांना ज्या प्रकारे स्वतंत्र देशाची मान्यता दिली, २००८ मध्येही जॉर्जियाच्या अबकाजिया व दक्षिण ओसेशियाला असेच स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.
शेवटी रशियाचा उद्देश तरी आहे काय?
२००८ मध्ये जॉर्जिया नाटोत सहभागी होऊ नये, हा रशियाचा उद्देश होता. तो त्यात यशस्वी ठरला. हाच फॉर्म्युला युक्रेनवर आजमावला जातोय. युक्रेन नाटोमध्ये गेल्यास रशियाची अडचण काय?
असे झाल्यास नाटो लष्कर रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. रशियाला असे कदापि नको आहे.
दोनेत्स्क व लुहान्स्क क्षेत्रांनाच का निवडले?
ही क्षेत्रे एकेकाळी युक्रेनची औद्योगिक नगरी होती. येथे रशियन भाषिक जास्त आहेत. यामुळे युक्रेनविरुद्ध फुटीरवादाला जास्त खतपाणी मिळते. यामार्गे युक्रेनमध्ये लष्कर पाठवणे सोपे होते.
युद्ध झाल्यास काय नुकसान होईल?
युक्रेन दुसरा अफगाणिस्तान बनू शकतो. संपूर्ण युरोप त्याच्या तडाख्यात सापडेल. रशिया गव्हाचा मोठा निर्यातक असल्याने अन्न संकट गडद होऊ शकते. तसेच तो पेट्रोलियम पदार्थांचाही निर्यातक आहे. यामुळे तेलाचे दर वाढतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.