आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तराची कारवाई:रशियाचा ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा वर्षाव; युक्रेनमध्ये अनेक शहरांत संचारबंदी, रशिया आक्रमक

कीव्हएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रशियातील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थान क्रेमलिनवर ड्रेन हल्ल्याच्या घटनेनंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि अन्य शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. गुरुवारी रशियन लष्कराने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. चार दिवसांत तिसऱ्यांदा कीव्हला लक्ष्य करण्यात आले. खेरसोनमध्ये रशियाच्या गोळीबारात २३ नागरिकांचा मृत्यू झाला. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात धोकादायक हल्ला असल्याचे बोलले जात आहे. कीव्हचे प्रशासक सेर्ही पाप्को यांनी सांगितले की, युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे खाली पाडली.

रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप युक्रेनवर केला असून आपल्या पद्धतीने बदला घेण्याची धमकी दिली आहे. क्रेमलिन येथे १५ मिनिटांच्या अंतराने दोन ड्रोन आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक रडारने ते निष्फळ केले. यामुळे इमारतीचे किरकोळ नुकसान झाले आहे. रशियाच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे खेरसोनसह अनेक शहरांत शुक्रवारपासून सोमवारपर्यंत ५८ तासांची संचारबंदी लागू केली आहे.युरोप दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हे नाटक रचले आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने रशिया हल्ला आणखी तीव्र करेल, रशियाच्या आरोपाबाबत युक्रेन आणि अमेरिकेला वाटते. दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्ध भडकावल्याचा आरोप केला आहे. कीव्हमधील अमेरिकी दूतावासाने ड्रोन हल्ल्यानंतर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांचा इशारा जारी केला आहे.

ड्रोन स्ट्राइक रशियाचे नाटक : यूएस थिंक टँक
अमेरिकास्थित थिंक टँक इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ वॉरने म्हटले आहे की एवढी कठोर हवाई संरक्षण प्रणाली ओलांडून दोन ड्रोन क्रेमलिनपर्यंत पोहोचू शकले याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. त्याची छायाचित्रेही चांगल्या पद्धतीने काढण्यात आली आहेत. रशियाने हा हल्ला जाणीवपूर्वक केला आहे. मात्र, अशाप्रकारे आपली कमजोरी दाखवून रशियाला काहीही फायदा होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

झेलेन्स्कींना ठार करणे हाच मार्ग
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी या संदर्भात म्हटले की, आता आमच्याकडे झेलेन्स्की यांना संपवण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही.

रशिया सागरी केबल्सना लक्ष्य करू शकतो : नाटो
नाटोचे सहायक सरचिटणीस डेव्हिड कॅटलर यांनी इशारा दिला आहे की रशिया नाटोच्या संवेदनशील पायाभूत सुविधांवर लक्ष्य करू शकते. पश्चिम युरोप इंटरनेट सेवा आणि गॅस पुरवठ्यासाठी त्यावर अवलंबून आहे. ते म्हणाले की रशियाने अटलांटिक महासागर, उ. समुद्र व बाल्टिकच्या सभोवताली गस्त असामान्य पद्धतीने वाढवली आहे.

झेलेन्स्की आंतरराष्ट्रीय कोर्टात म्हणाले, पुतीनना शिक्षा व्हावी
नेदरलँड दौऱ्यादरम्यान झेलेन्स्की गुरुवारी हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले. पुतीन यांना त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांसाठी शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी हल्ल्यासाठी पुतीन आणि अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. अमेरिकेसह काही देशही पाठिंबा देत आहेत.